सातारा जिल्ह्यातील दूरदर्शनची 6 लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय 

सातारा : सातारा जिल्ह्यातील दूरदर्शनची कराड, पाटण, फलटण तसेच कोरेगाव, वाई, वसंतगड येथील लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र येत्या 31 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील प्रसार भारती बोर्डाच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत आकाशवाणी येथील दूरदर्शनच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.
केंद्र शासनाच्या प्रसार भारती बोर्डाने सुरू केलेली देशातील पहिली दरचित्रवाणी वाहिनी म्हणून दूरदर्शनची ओळख आहे. देशातील 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत कोणतेही खासगी चॅनल जात नाही. मात्र, दूरदर्शन खेडोपाडी पोहोचले आहे.
दूरदर्शनचा समाजमनावर आजही फारसा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात खासगी वाहिन्यांचा प्रभाव वाढला, तरी दूरदर्शनवरील कार्यक्रमांना तितकेच महत्त्वाचे स्थान दिले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रसार भारती बोर्ड नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार दुरदर्शन लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र कराड (चॅनेल 12), पाटण (चॅनेल 9) व फलटण (चॅनेल 7) तसेच अतिलघुशक्ती प्रक्षेपण केंद्र कोरेगाव (चॅनेल 10), वाई (चॅनेल 7) व वसंतगड (गांधीटेकडी चॅनेल 5) येथील दुरदर्शनच्या सह्याद्री व नॅशनल वाहिन्यांचे प्रक्षेपण बुधवार दि. 31 च्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याचा फतवा आकाशवाणी केंद्र परिसरातील दूरदर्शन अनुरक्षण केंद्राच्या सहाय्यक अभियंता चित्ररेखा कुलकर्णी यांनी काढला आहे.
या निर्णयाबाबत दुरदर्शनच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता ते म्हणाले, या केंद्रावरून सह्याद्री व नॅशनल वाहिन्यांचे प्रक्षेपण होत असते. मात्र, प्रसारभारतीच्या आदेशानुसार प्रक्षेपण बंद होणार असल्याने या वाहिन्यांचे प्रसारण बंद होणार आहेत. प्रक्षेपण बंदचा कालावधी वरिष्ठ कार्यालयाकडून काही दिला नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
दुरदर्शन लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र कराड, पाटण व फलटण व अतिलघुशक्ती प्रक्षेपण केंद्र कोरेगाव, वाई व वसंतगड या ठिकाणी  अभियांत्रिकी विभागाचे 4 ते 5 इंजिनिअर्स काम करत होते. या कर्मचार्‍यांचे भवितव्य काय याबाबत  विचारणा केली असता संबंधित अधिकार्‍यांनी वरिष्ठ कार्यालयांकडे बोट दाखवले.