सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सातारा : असंघिटत कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नोंदण्या तत्काळ सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या 12 ते 13 वर्षांपासून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, यासाठी पाठपुरावा करत आहे. शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ न करता सर्वच असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र असंघटित कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा केली आहे.संघटनेचे शिष्टमंडळ कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांना भेटले. तेव्हा आपल्या मागण्याबाबत लवकरच विचार केला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी. महाराष्ट्र राज्य असंघटित सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठीत करा, गटई कामगाराप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात धरू नये, सुरक्षा मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा सुविधा तत्काळ देण्यात येऊन मंडळ प्रत्यक्षात कार्यरत करण्यात यावे, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा.
या धरणे आंदोलनात सुभाष शिंदे, आनंदा धोंडवड, ताजुद्दीन आगा, नितीन गुरुव, विकास क्षिरसागर, सुनिल जाधव, आमोल ओव्हाळ, सावळाराम जंगम, गणेश भोरे आदी सहभागी झाले होते.