सातारा जिल्ह्यातील अकार्यक्षम व कार्यरत नसलेल्या ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याच्या कारवाईस सुरुवात :- सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुर्यवंशी

सातारा , दि. 17 (जिमाका):  महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे सुधारत  कलम 22 (3) नुसार कार्यरत नसलेल्या अकार्यक्षम  तसेच ट्रस्टचे उद्देश पूर्ण झालेले , ट्रस्टचे प्रयोजन बेकायदेशीर झालेने, मालमत्ता नष्ट केल्यामुळे  अथवा ट्रस्टच्या प्रयोजनाची पूर्ती करणे  अशक्य झालेले, ट्रस्टच्या हेतूपूर्तीसाठी  विश्वस्त कोणतेही कार्य करीत नसल्याचे आढळून आलेले तसेच विश्वस्तांनी गेल्या पाच वर्षाची हिशोबपत्रके किंवा फेरफार अर्ज सादरन केलेले अशा सर्व न्यासांची नोंदणी  करणेबाबत  विशेष  मोहिम धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार सातारा कार्यालयामार्फत चालू करण्यात आलेली आहे  .   या कार्यालयांत आज अखेर सुमारे 16 हजार पेक्षा अधिक धर्मादाय संस्थांची नोंदणी  झालेली आहे. तथापि  त्यापैकी सुमारे 20 टक्केच्या  आसपास संस्था कार्यरत असून उर्वरित सर्व संस्था  नाममात्र असल्याची माहिती सहाय्यक धर्मादाय  आयुक्त यांनी दिली . ज्या संस्थांनी गेल्या पाच वर्षापासून  हिशोबपत्रके अथवा बदल अर्ज दाखल केलेले नाहीत  अशा संस्थांची वर्गवारी अकार्यरत व अकार्यक्षम अशा गटामध्ये केलेली  असून त्या सर्व संस्था रद्द करण्यांबाबत कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. रद्द करण्यात येणाऱ्या संस्थांची यादी  कार्यालयाच्या नोटीस  बोर्डवर प्रसिध्द करणेत आलेली आहे. तसेच सदरची यादी व नोटीस धर्मादाय खात्याच्या  https://charitymaharashtra.gov.in  या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अशी माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. सुर्यवंशी यांनी दिली आहे.