धनगर समाजाचा फलटण तहसीलदार कार्यालयावर शेळ्या मेंढ्यासह मोर्चा

फलटण: धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीमध्ये (एस.टी.) आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी सरकार विरोधात दि 14 राजी तहसीलदार कार्यालयावर शेळ्या मेंढ्यासह मोर्चा काढण्यात आला होता यावेळी धनगर समाजातील महिलांच्या वतीने तहसीलदार विजय पाटील व पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांना निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मंगळवार दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता नाना पाटील चौकामधून मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात मोठ्या संख्येने धनगर समाज शेळ्या मेंढ्यासह सहभागी झाला होता. यावेळी फलटण तहसीलदार कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील धनगर व धनगड जमात एकच असून घटनेतील तरतुदी प्रमाणे धनगर समाजास एसटी मधील आरक्षण सवलती लागू करण्यासाठी केंद्राकडे महाराष्ट्र शासनाने त्वरित शिफारस करावी. समांतर आरक्षण त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे गुणवत्तेनुसार व आरक्षण तरतुदी नुसार सुरू करण्यात यावे. सोलापूर विद्यापीठासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नामकरण करून त्यांची त्वरित अंमलबजावणी करावी.
आजअखेर धनगर जमातीतील बांधवांनी अदोलन केलेली असतील त्या काळातील समाज बांधवावरील सरकारने  केलेल्या केसेस त्वरित मागे घेण्यात याव्यात. टीस अहवाल मंत्री मंडळापुढे ठेवण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीस विश्वात घेण्यात यावे.
मेंढपालांसाठी चराऊ कुरणासाठी वनखात्याच्या जमिनी व  गायराने खुली करून द्यावीत अशा प्रमुख मागण्याचे निवेदन फलटण तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सातारा जि.प सदस्याभावनाताई सोनवलकर, नगरसेविका वैशाली चोरमले,जि.प.सदस्या उषाताई गावडे,  माजी जि.प सदस्या कमलताई माडकर, नंदाताई चोरमले, सिंधुताई चोरमले, बेबी चोरमले इत्यादी महिलांच्या हस्ते तहसीलदार विजय पाटील व पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांना देण्यात आले.
तहसिल कार्यालयाच्या बाहेर मोर्चा आल्यानंतर त्याठिकाणी कृती समितीच्या सदस्यांनी उपस्थित लोकांच्या समोर बोलताना सांगितले की, धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. धनगर शब्दामध्ये मरफ चा मडफ झालेला असून तो देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करण्यात यावा. सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी धनगर समाजास आरक्षण देणारच ही भूमिका मांडली होती. नंतर महाराष्ट्रात जे सत्ता परीवर्तन झाले धनगर समाजामूळे सरकार सत्तेत आले. गेली चार वर्षात शेकडो कॅबिनेटच्या मिटिंग झाल्या तरी आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. मुख्यमंत्री यांनी धनगर समाजास दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.
पुढील काळात तात्काळ आरक्षण दिले नाही तर ज्या समाजाने सरकारला सत्तेत आणले तोच धनगर समाज सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही. दि 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. तर दि 8 सप्टेंबर रोजी चौंडी येथे महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
धनगर समाजाने महाराष्ट्र शासनाने त्वरित अंमलात आणाव्यात अन्यथा दि 8 सप्टेंबर नंतर धनगर समाज रस्तावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे या वेळी फलटण तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.