सातारा – राज्य सरकारकडे कोरोना काळापासून थकीत असलेली देयके तातडीने अदा करावीत या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, याचाच भाग म्हणून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने बांधकाम भवन येथे धरणे आंदोलन केले.
यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन देशमुख, सातारा सेंटरचे अध्यक्ष अनिल दातीर, सेक्रेटरी कौस्तुभ मोरे, इतर पदाधिकारी, सदस्य व सरकारी ठेकेदार मोठया संख्येने उपस्थित होते.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन देशमुख यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या अनेक समस्या आहेत. त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे गेले दोन वर्षापासून विभागाकडे असणारी देयके अपुऱ्या निधीच्या अभावी प्रलंबित आहेत. काही ठिकाणी 31 मार्च अखेर फक्त 5 ते 10% निधी उपलब्ध झाला व तेवढ्याच रकमेची बिले काढली गेली. दुसरा एक प्रमुख मुद्दा म्हणजे आधीची देयके तशीच प्रलंबित ठेवून नवीन आर्थिक निधीची कोणतीही तरतूद न करता निविदा काढण्याचा प्रकार सुरु आहे. हा ठेकेदारांवर होणारा अन्याय आहे.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरचे अध्यक्ष अनिल दातीर यांनी या आंदोलना संदर्भात माहिती देताना सांगितले की, अनेक महिन्यांपासून थकीत बील मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु थकीत बिले अदा करण्याबाबत संबंधितांनी कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. यामुळे नाईलाजास्तव संपुर्ण राज्यभर बिल्डस असोसिएशन तर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील ठेकेदारांची बहुतांशी बिले निघाली आहेत, पण राज्यभरातील इतर जिल्ह्यातील ठेकेदारांना संघटनात्मक पाठिंबा म्हणून हे आंदोलन केले जात आहे.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व थकीत बीले त्वरीत अदा करण्याचे निवेदन अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांना देण्यात आले.