कोयता चालवणार्‍या हातांना मिळाला सन्मान; भारतीय मराठा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

तळमावले : रोज सकाळी लवकर उठायचे, रक्त गोठवणार्‍या थंडीत आभाळाच्या छायेत आंघोळ करायची, उघडयावरच असेल तो नाष्टा करायचा आणि मुकादमाची हाळी आली की, ऊसतोडीच्या कामाला लागायचं, दुपारच्या वेळेला न्याहारी करायची, संध्याकाळी परत आपल्या खोपटयात जायचं. असाच त्यांचा काहीसा दिनक्रम. परंतू आज या ऊसतोडीच्या टोळीला एक वेगळा अनुभव आला. आणि त्या अनुभवाने टोळीला एक नवीन ऊर्जा मिळाली आणि त्यांचे चेहरे आनंदाने हरखून गेले. डोळयामध्ये आनंदाने अश्रू तरळले. वेगळा माणूसकीचा अनुभव त्यांना मिळाला.त्याचे असे झाले. पाटण तालुक्यातील कुठरे पवारवाडी येथील संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेले अविनाश पवार हे समाजसेवेच्या ध्यासाने झपाटलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम आतापर्यंत राबवले आहेत. गेली आठ वर्षापासून ते भारतीय मराठा संघाची दिनदर्शिका प्रकाशित करत आहेत. या दिनदर्शिकेमध्ये त्यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती असते.सन 2019 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन त्यांनी या ऊसतोडीच्या मजुरांच्या हस्ते केले. आतापर्यंत मुकादम किंवा मालक यांचा ओरडा खात असलेल्या या व्यक्तिंच्या हस्ते अविनाश पवार आणि त्यांचे सहकारी यांनी प्रकाशन केल्यामुळे या व्यक्तिंच्या चेहर्‍यावर आनंद ओसांडून वाहत होता. एवढेच नाहीतर त्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते. दिनदर्शिकेचे केवळ प्रकाशनच अविनाश पवार यांनी केले नाही तर त्यांच्या नाष्टयाची चांगली सोय केली. ऊसतोड कामगारांसोबत दिनदर्शिकचे प्रकाशन करण्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार, अंकुश पाटील, शेतमालक राजेंद्र पाटील,  सुनील पवार, पत्रकार हरीष पेंढारकर, पोलीस पाटील विजय सुतार यांच्या हस्ते मोळावडेवाडीच्या वाघडोह या शिवारात उपस्थित होते.भारतीय मराठा संघाच्यावतीने यापूर्वी संघामधील लोकांना मदत करणे, वंचीत असलेल्या विद्याथ्यार्ंंची वर्षभराची शैक्षणिक फी भरणे, उद्योगपतींचे मार्गदर्शन आयोजित करणे, मराठा आरक्षणात सहभागी, मोफत शालेय साहित्य वितरण, शाळेला संगणक असे विविध उपक्रम अविनाश पवार यांच्या संकल्पनेतून साकारले आहेत.ज्या लोकांना समाजामध्ये मानपान मिळत नाही अशा लोकांना मानपान देणे त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे हसू फुलवणे या एकाच विचारातून त्यांनी आपल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ऊसतोड मजूरांच्या हस्ते घेतले होते.आजपर्यंत लोक फक्त आमच्याकडे उसतोड कामासाठीच विचारणा करीत होते. परंतू आजचा दिवस आमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा दिवस होवून गेला. आमच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन केल्याबद्दल मी भारतीय मराठा संघाचा आभारी आहे. समाजामध्ये अजूनही माणुसकीचा ओलावा शिल्लक आहे याची प्रचिती यानिमित्ताने आली. – बबनराव शिंगाडे, ऊसतोड मुकादम