जिल्ह्यात पावसाची उसंत; कोयनेत 46 टीएमसी पाणी साठा

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणार्‍या कोयना पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागामध्ये पावसाने गुरुवारी उसंत घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली असून आठ दिवसानंतर संगमनगर धक्क्याच्या पलिकडील गावे दळण-वळणासाठी खुली झाली आहेत. कोयना कॅचमेंट एरियामध्ये 53 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून कोयना धरणाचा पाणी साठा हा 46.22 टीएमसीवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा तब्बल साडेचार टीएमसीने कमी असून दिवसभरात उन पावसाच्या खेळातही धरण क्षेत्रात 2 टीएमसी वाढ झाल्याची माहिती धरण व्यवस्थापनाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्याच्या पूर्व भागात सातारा, वाई, जावली, महाबळेश्‍वर या तालुक्यातही पावसाचा उघड झापीचा खेळ सुरुच होता. महाबळेश्‍वरमध्ये संततधार कमी होऊन रिमझिम पाऊस सुरुच राहिल्याने पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे.
सातारा जिल्ह्यात दुष्काळी माण, फलटण, खंडाळा या तीन तालुक्यामध्ये पावसाने उसंत घेतली असून जिल्ह्यात आज सरासरी 12.16 मिमी पाऊस झाला असून 139.5 मिमी एवढा एकूण पाऊस झाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच असून आज 60 मिमी पाऊस झाला. नवजा येथे 24 मिमी; महाबळेश्‍वर येथे 20 मिमी, पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील कराड, पाटण, तसेच जावली भागात काही ठिकाणी भात लागवडीची कामे सुरु झाली आहेत.
भात लागवडीची शेतकरी वर्ग भातांच्या खेचरामध्ये पुरेसे पाणी सोडून भात लागवड करताना चिखलात आबाडीचा वापर आजही शेतकरी करु लागले आहेत. आजही भर पावसात भाताची लागवड टोकण पध्दतीने करण्यात येत आहे. भात लागणीसाठी शेतकर्‍यांची जून मध्येच तरवाची पेरणी केल्यामुळे भाताचे तरु लागवडी योग्य झालेली आहेत. जिल्ह्यात कोयना धोम, कण्हेर, उरमोडी, निरा-देवधरसह सर्वच्या सर्व 15 धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
कोयना धरणात सायंकाळी 6 वाजता 46.62 टीएमसी एवढा पाणीसाठा पाणी साठ्यात वाढ झाली आहे. गुरुवारी पाऊसाने उसंत दिल्यामुळे शेतकर्‍यांनी खरीप पिकांच्या कोळपणीला प्रारंभ केला आहे. आगाम पेरा झालेली खरीप पिके सध्या जोमात असून शेतकर्‍यांनी जमिनीला मिळेल त्या घातीनंतर हायब्रीड, भुईमूग, भात, नाचणी, वरी, घेवडा, सूर्यफूल, मका या पिकांची पेरणी केलेली आहे.
औंध : मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने बुधवार पासून औंध सह अनेक गावांमध्ये थोडी फार उसंत दिली असून पेरे झालेल्या पिकांसाठी चांगल्या उघडीपीची गरज असून पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरणाची गरज आहे. अजूनही दिवसातून पावसाच्या चांगल्या सरी खटाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयात कोसळत आहेत.
यंदा वळीवासह मान्सूनच्या पावसाने औंध सह परिसरातील त्रिमली, नांदोशी, खबालवाडी, जायगाव, अंभेरी, भोसरे, लोणी, पळशी, खरशिंगे, करांडेवाडी, गणेशवाडी या दुष्काळी पट्टयातील गावांमध्ये चांगला पाऊस झाल्याने जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवडयात पिकांच्या पेरणीस सुरुवात झाली होती.
यादरम्यान मूग, चवाळी, सोयाबीन, वाघा घेवडा, धना ,वाटाणा,हायब्रीड ज्वारी, बाजरी, उडीद व अन्य पिकांच्या पेरण्यांना मोठया प्रमाणात सुरुवात झाली होती. पण त्यानंतर सलग दहा ते बारा दिवस धुवाँधार पावसाने हजेरी लावल्याने फक्त 50 ते 60 टक्के क्षेत्रावरच पिकांचे पेरे झाले होते. मागील दोन वर्षे दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकरी, दुष्काळी भागातील जनतेला यंदा पाऊस तरी तारणार का? उघडीप देणार का? अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु बुधवारपासून काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा पुन्हा कामा ला लागला असून अजूनही कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी पडत असून
येत्या काही दिवसात पावसाने पूर्ण उघडीप दिल्यास पिकांना चांगला सूर्यप्रकाश मिळाल्यास पोषक वातावरण निर्माण झाल्यास पेरणी झालेल्या पिकांपासून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून सध्या सततच्या पावसामुळे पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली आहे.
पावसाने 8ते10दिवस चांगली उघडीप दिल्यास रखडलेल्या बटाटा पिकाच्या लागवडीस ही गती येण्याची शक्यता असून सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये वाफसा आला नाही. परंतु पावसाने अशीच चांगली उघडीप दिल्यास यंदा खरीप हंगाम चांगला साधेल अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत.