पाटणमध्ये दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुका उत्साहात

पाटण:- दुर्गा माता की जय.. आंबे माता की जय.. घोषात  बॅंजो, ढोल-ताशांचा गजर, ब्रास बॅंडच्या तालावर फटाक्यांची आतषबाजीत तसेच गरबा, दांडीयाच्या तालावर पाटणमधील विविध मंडळांच्यासह परिसरातील दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुका गुरूवार दि. १८ व शुक्रवार दि. १९ रोजी शांततेत व भक्तीमय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. दरम्यान प्रारंभी पाटणचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई देवीच्या पालखीची मिरवणूक पाटण शहरातून काढण्यात आली. सायंकाळी सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर शहरातील दुर्गामातेच्या मिरवणुकांना सुरूवात झाली.

गेल्या दहा दिवस पाटण शहरातील सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांच्यावतीने महाआरती, भजन, किर्तन, विविध स्पर्धा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विविध कार्यक्रमांबरोबरच गरबा व दांडियाचेही आयोजन करण्यात आले होते. युवक-युवतींनी मनसोक्तपणे गरब्याचा आनंद लुटला. तरूणाईसह अबालवृध्दानेही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे संपूर्ण पाटण शहर भक्तीमय बनले होते. गुरूवार दि. १८ रोजी विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी पाटणची ग्रामदेवता श्री लक्ष्मीआई देवीच्या पालखीची पाटण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. तद्‌नंतर काही सार्वजनिक दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर काही मंडळांनी शुक्रवार दि. १९ रोजी दुर्गामातेच्या मूर्तींचे उत्साहपूर्वक वातावरणात विसर्जन केले.
पाटणमधील परिसरातील अष्टगंध दुर्गाउत्सव मंडळ, मोरेगल्लीतील समाज सेवा दुर्गा उत्सव मंडळ, शिवलिंग दुर्गा उत्सव मंडळ, शिवाजी उदय दुर्गा उत्सव मंडळ, रामापूर येथील श्रीराम दुर्गाउत्सव मंडळ, कुंभारवाड्यातील गजानन सेवा दुर्गाउत्सव मंडळ, नवीपेठेतील रणजित सेवा मंडळ, चाफोली रोड येथील जयभारत दुर्गा उत्सव मंडळ आदी मंडळांच्या गुरूवार दि. १८ रोजी सायंकाळी ४ नंतर तर झेंडाचौकातील प्रताप सेवा दुर्गाउत्सव मंडळ, मोरेश्वर दुर्गाउत्सव मंडळ आदी मंडळांनी शुक्रवार दि. १९ रोजी सायंकाळी ४ वाजता विसर्जन मिरवणूक सोहळ्यास सुरूवात केली. रात्री ११ वाजता विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. शहरातील विविध मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह आरास तयार केली होती.
दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत होतो. मिरवणुका पाहण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. फटाक्यांची आतषबाजी व विविध गाण्यांच्या तालावर मंडळाचे कार्यकर्ते नाचत होते. पाटण शहरातील सर्व विसर्जन मिरवणुका उत्साहात व शांततेत पार पडल्या. मिरवणुककाळात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पोलिसांबरोबर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतर्क होते. सायंकाळी ११ वाजता विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येथील कोयनानदीपात्रात दुर्गामातेचे विसर्जन केले. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाटणचे सपोनि उत्तमराव भापकर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.