छत्रपती उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करा :- माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर

पाटण :- सध्याचे सरकार हे देशातील उद्योगपतींचे सरकार  असून ते शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांच्या विरोधातील असल्याने ते घालवण्याची वेळ आता आली आहे.  खा.उदयनराजे भोसले यांना पाटण तालुक्यातून सर्वात जास्त मताधिक्याने निवडून देऊन खा.शरद पवारांचे हात बळकट करू असे आवाहन राज्याचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.

सातारा लोकसभा  मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात चर्चा व नियोजन करण्याकरीता पाटण विधानसभा मतदारसंघील  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक संभाजीराव गायकवाड, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, जि. प.सदस्य रमेश पाटील, पं. स.सभापती सौ. उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, निवासराव पाटील, राजाभाऊ काळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले. शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात देशातील गरीब महागाईने मरत आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. महिलांवर अत्याचार वाढले आहेत, सिमेवर रोज सैनिक शाहिद होत आहेत तरीदेखील हे सरकार काहीच करत नाही. गेली ५ वर्षे संपूर्ण देशाचा कारभार फक्त दोनच लोक पाहत आहेत. त्यामुळे देश आता हळूहळू लोकशाही सोडून हुकूमशाहीकडे चालला आहे. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  स्वतःला चौकीदार म्हणवणाऱ्या मोदींना राफेल खरेदी प्रकरणातील कागदपत्रे कशी चोरीला गेलेली माहिती नाही आणि मै भी चौकीदार म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांना धनगर आरक्षणाची कागदपत्रे कशी चोरीला गेली हे माहिती नाही. असले चौकीदार काय कामाचे ? असा टोला त्यांनी सरकारला दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण जाहिरातबाजीसाठी अमाप पैसा उधळला जात आहे. महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढत आहे. हे सर्व कर्ज सर्वसामान्य लोकांनाच चूकवायचे आहे म्हणून हे दिवाळखोर सरकार पुन्हा निवडून येता काम नये असे आवाहनही शेवटी विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.

यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले. पाटण तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराजांच्या गादीशी प्रामाणिक राहिला आहे आणि  यापुढेही प्रामाणिकच राहणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत पाटण तालुक्यातुन महाराजांना चांगल्याप्रकारे मताधिक्य पाटणकर गटाने दिले आहे. यावेळी त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य पाटणकर गट देणार असा विश्वास सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना संभाजीराव गायकवाड म्हणाले. हे हुकूमशाहांचे सरकार बदलण्याची वेळ आता आली आहे. यावेळच्या निवडणुकीत आपण गाफील राहून चालणार नाही. पाटण तालुक्यातून येणाऱ्या निवडणुकीत आपले उमेदवार उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन संभाजीराव गायकवाड यांनी केले. यावेळी रमेश पाटील,राजाभाऊ शेलार यांनी आपली मनोगत व्यक्त केली. स्वागत राजाभाऊ काळे यांनी तर आभार प्रदर्शन उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केले. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.