विस्कळीत वाहतूक व्यवस्थेने खा. उदयनराजे भोसले यांच्या संतापाचा पारा चढला ; वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीची बैठक

सातारा : ऐन उन्हाच्या तडाख्यात विस्कळीत वाहतूक व्यवस्येने खासदार उदयनराजे भोसले यांच्या संतापाचा पारा शुक्रवारी चढला. उदयनराजेंनी आपल्या शैलीत बांधकाम विभागावर निशाणा साधल्याने पालिकेत सातारा विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची एकच धावपळ झाली. विकास कामे करताना नागरिकांची गैरसोय करू नका अशा परखड कानपिचक्या उदयनराजे यांनी देत पालिका कर्मचारी पदाधिकारी यांचा घामटा काढला. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी सभापती व वाहतूक विभागाची तातडीची बैठक संध्याकाळी नगरपालिका संपता संपता बोलावली.
या बैठकीत अनेक विषयांवर खलं झाला. सातारा स्टँन्ड ते पोवई नाका, कोरेगाव मार्ग शाहूपुरी मार्ग सदर बझार शहराच्या चारही कोपर्‍यांची ग्रेड सेपरेटरच्या कामाने कोंडी झाली आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत असून एस टी भाडे सहा तर रिक्षा भाडे दहा रुपयांनी वाढले आहे . ग्रेड सेपरेटरच्या कामावर पालिकेचे कोणतेच नियंत्रण नाही त्याचे डे टू डे रिपोर्टिंग होत नाही या तक्रारीने उदयनराजे यांनी शुक्रवारी पालिकेत येउन बांधकाम विभागाचे अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्यावर चांगलाच जाळ काढला. शहराच्या पश्चिम भागात शहापूर योजनेचे अत्यंत कमी दाबाने पाणी येते अशा वारंवार तक्रारी झाल्याने पाणीपुरवठा विभागावरही उदयनराजे यांनी ताशेरे ओढले. कामाच्या नावाखाली नागरिकांची असुविधा करु नका असे स्पष्टपणे त्यांनी बजावले. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी तातडीने सर्व सभापती एन ए इन्फ्राचे प्रोजेक ट मॅनेजर .,वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांची तातडीची बैठक बोलावली. स्टॅन्ड परिसरातील अतिक्रमणे हटविणे रविवार पेठेतील रस्त्यांची पॅचिंग आवश्यक सिग्नल यंत्रणा शाहू चौक ते पोवई नाका या दरम्यान खोदाई झटपट उरकणे या विषयांवर सविस्तरपणे कमराबंद चर्चा झाल्याचे वृत्त आहे.