विलगीकरण मुदत संपल्याने पाचगणीतून उधोगपतीसह २३ जण खुले ; आता अधिकृत परवानगीचा खल

सातारा  (अजित जगताप ) :-  संपूर्ण देशात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउनची घोषणा केली.गरज नसतानाही घरातून बाहेर आलेल्या सामान्य जनतेला पोलिसांचा प्रसाद मिळाला.पण,डी एच एफ एल चे वाधवान कुटुंबातील सदस्य व सेवक अशा २३ जणांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा एका शिफारस पत्राच्या आधारे प्रवास केला. त्यांना पाचगणी येथे विलगीकरण करण्यात आले.त्याची आज मुदत संपली.आता दुसरा अंक सुरू झाला असून पुढे काय? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
याबाबत माहिती अशी की, लॉकडाउन मुळे आबालवृद्धांना प्रवास करता आला नाही. अनेकांचे हाल झाले.गरज असतानाही अनेकांना प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला.ज्यांनी नियम तोडले त्यांना पोलिसांनी सुलटून काढले.काहींना समजावून सांगितले.माणुसकीचे दर्शनही पोलिसांनी घडविले. मात्र पुणे-सातारा जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी महामार्गावर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गुरुवारी दि ८ एप्रिल रोजी मध्यरात्री थेट गृह विभागाचे मुख्य सचिव (विशेष) अभिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र दाखवून खंडाळा येथून महाबळेश्वर असा २३ जणांनी पाच वाहनांच्या ताप्यासह प्रवास केला.स्थानिक प्रशासनाला माहिती देण्याची तसदी घेतली नाही.अधिकृत परवानगी काढली नाही.या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत संगीता राजापूरकर,तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील,महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी अमिता दगडे -पाटील,पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हे दाखल केले.एवढेच नव्हे तर त्यांची वाहने जप्त करून त्या सर्वांना महाबळेश्वर येथील आलिशान बंगल्यातुन बाहेर काढून पाचगणी येथील एका विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले.मोठ्या उधोगपती व त्याच्या कुटुंबातील सदस्य,सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज न करता फक्त गृह सचिवांच्या शिफारस पत्रावर लॉक डाउनच्या काळात खुलेआम प्रवास केला. त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली नाही. याची तपासणी करून महाबळेश्वरला कारवाई झाली असली तरी पुणे -सातारा जिल्ह्यातील हद्दीतून प्रवास करताना त्या पत्राची चौकशी का झाली नाही? अशा पत्रावर लॉकडाउन काळात प्रवास करता येतो का?अशी विचारणा का केली नाही? अशा अनेक बाबी उघड होणे गरजेचे आहे.पण,सध्या उदयोगपती वधावान व गृह सचिव हेच दोन मुद्दे घेऊन राजकीय काही नेते सूरपारंब्याचा खेळ खेळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सदर घटनेला चौदा दिवस पूर्ण झाले असून विलगीकरण मधून २३जण बाहेर येतील.त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन होईल.वकिलांची फौज परवानगी काढून पोलीस ठाणे,न्यायालयात येतील. पुढे काय? याचे उत्तर सामान्यांना मिळणे अपेक्षित आहेत.
विलगीकरण झाल्यानंतरच वैदकीय सल्ल्यानुसार सी बी आय यंत्रणा इतर गुन्ह्याबाबत वधावान यांची चौकशी करू शकतात. तूर्त उधोगपती व त्यांचे सहकारी महाबळेश्वर येथील बंगल्यात काही दिवस थांबून थंड हवेचा आस्वाद घेतील.सामान्य मात्र,आपल्या अंगावरील वळ पाहून कानून के हाथ लंबे है।असे म्हणतील का ? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याची जबाबदारी कोणी तरी घेतली का? की राजकारण करतील याची चर्चा रंगू लागली आहे.