वडूज येथे शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या 

वडूज : येथील कर्मवीर नगरातील गणेश राजाराम निलाखे (वय 43) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. 30 रोजी घडली. गणेश याच्यावर विविध बँका व पतसंस्थांचे शेतीसाठी काढलेले कर्ज थकीत असल्याने त्याने कर्जाला कंटाळून मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याचा खबरी जबाब त्याचा भाऊ नागेश निलाखे (वय 45 रा. वडूज ) यांनी दिला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडगाव रस्त्यावरील कर्मवीर नगर वसाहतीत निलाखे कुटूंबिय राहत होते. नागेश निलाखे हे सातारा येथे काम असल्याने सकाळी नऊ वाजता गेले होते. त्यावेळी घरी त्यांची पत्त्नी सौ. निर्मला तसेच गणेश याची पत्नी व मुले घरी होती.  गणेश निलाखे हे घरातील वरच्या मजल्यावर विभक्त राहण्यास होते. गणेश याने राहत्या घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज दुपारी साडेबारा वाजता  भावजय निर्मला  निलाखे यांनी पती नागेश  यांना सांगितले. त्यानंतर ही घटना पोलीसांना सांगण्यात आली. पोलीसांनी प्रेत खाली उतरून प्रेताचा पंचनामा केला.
गणेश याच्यावर विविध बँका व पतसंस्थांचे शेतीसाठी काढलेले कर्ज थकीत होते. या थकीत कर्जाच्या मानसिक तणावाखाली तो राहत होता. या कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बंधू नागेश यांनी पोलीसांत दिलेल्या खबरी जबाबात म्हटले आहे.