Thursday, March 28, 2024
Homeठळक घडामोडीआषाढी वारीतील 2000 स्वयंसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न

आषाढी वारीतील 2000 स्वयंसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न

कराड: दोन हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी 3 दिवस पंढरपूरात राहून वारकर्‍यांची सेवा करण्याचा उपक्रम पंढरपूरच्या इतिहासात पहिल्यांदा घडला आहे. अतुलबाबांसारखे व्यवस्थापनकुशल नेतृत्व असल्यामुळेच यंदाच्या आषाढी वारीत अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले गेले आहेत. स्वयंसेवकांनी वारकर्‍यांसाठी राबविलेल्या सेवाकार्याचे पुण्य स्वयंसेवकांनाही मिळेलच, शिवाय अतुलबाबांनाही या सेवाकार्याचे पुण्य नक्कीच लाभेल, असा विश्‍वास राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने यंदाच्या वारीत सेवाकार्य केलेल्या कराड दक्षिणमधील स्वयंसेवकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. मराठा समाजाला भाजप सरकारच आरक्षण देणार असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.
व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे ना.शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर, नगराध्यक्षा  रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, जि.प.सदस्य मनोज घोरपडे, शामबाला घोडके, सागर शिवदास,पं.स.सदस्या शुभांगी पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, पैलवान शिवाजीराव जाधव, दयाराम पाटील, गुणवंतराव पाटील, अमोल गुरव, निवासराव थोरात, शेतीमित्र अशोकराव थोरात, मोहनराव जाधव, आनंदराव मोहिते, धनाजी पाटील, आबासाहेब गावडे, महादेव पवार, आर. के. भोसले, बाजार समितीचे संचालक दिपक जाधव, अमित कदम (जावली), भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वयंसेवकांच्या सत्कारानंतर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, की अतुलबाबांनी आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंढरपूरमध्ये अनेक विधायक उपक्रम सुरू केले असून, त्याला सरकारचे खंबीर पाठबळ आहे. पंढरपूरच्या विकासासाठी चार दिवसांपूर्वीच सरकारने कोट्यवधी रूपयांच्या निधीची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न सुरू असून, उच्चशिक्षणासाठीच्या फी पैकी निम्मी फी भरण्याचे शासनाने अवलंबिले असून, आत्तापर्यंत 654 कोटी रूपये फी सरकारने भरले आहे. तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या मुलांना फेलोशिप दिली जाते. मराठा समाजाला भाजप सरकारच आरक्षण देणार असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.
विरोधकांनी गैरसमज पसरविणे बंद करावे : डॉ. अतुल भोसले
कराड दक्षिणमध्ये कुठंही विकासकाम सुरू झाले की ते स्वत:मुळेच झाले, असा डांगोरा पिटून विरोधक लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रकार करत आहेत, अशी टीका डॉ. भोसले यांनी विरोधकांवर केली. यावेळी नामदार डॉ. भोसले यांनी आषाढी काळात मंदिर समितीच्या माध्यमातून वारकरी भाविकांसाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन, कराड दक्षिणमधील स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक केले.
सत्तेशिवाय काँग्रेसवाले जगूच शकत नाहीत : मदनराव मोहिते
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तोंडसुख घेताना मदनराव मोहिते म्हणाले, की माजी मुख्यमंत्र्यांना चांगले बोलता येत नसेल तर त्यांनी मौन बाळगावे. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून भाजप सरकारला टार्गेट करणार्‍या पृथ्वीराज चव्हाणांनी आणि इतके वर्षे सत्तेवर असणार्‍या काँग्रेसच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? असा सवाल उपस्थित करत; काँग्रेसवाले सत्तेशिवाय जगूच शकत नसल्याने लोकांचा पुळका आल्याचे नाटक करत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
यावेळी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल व केरळमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहणारा शोकप्रस्ताव संजय पवार यांनी सादर केला. यावेळी उपस्थितांनी दोन मिनीटे मौन बाळगून आदरांजली वाहिली. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुभाष जाधव यांनी प्रास्तविक केले. पैलवान धनाजी पाटील यांनी आभार मानले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular