अखेर पाटण आगारातुन पाटण-पुणे बस सुरु ; पाटण तालुका पत्रकार संघटनेच्या मागणीला यश

पाटण. दि. २४ :- पाटण एसटी आगारातून एक-दीड वर्षापूर्वी कायम सुरु असलेल्या लांब पल्याच्या एसटी बसेस एसटी महामंडळाने अचानक बंद केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. ही बससेवा पुन्हा सुरू  करण्यात पाटण तालुका पत्रकार संघाला अखेर यश मिळाले. सर्वसामान्य जनतेच्या मागणीचा विचार करून पत्रकार संघाने पुढाकार घेत लांबपल्ल्याच्या बसेस सुरू झाल्या नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. याची गांभिर्याने दखल घेवून पाटण आगाराने लांबपल्ल्याची पाटण-पुणे ही एसटी बस पुन्हा सुरू केली याचा शुभारंभ पाटणचे सपोनि यु. एस. भापकर यांच्या हस्ते करण्यात आला.

पाटण आगारातून सोडण्यात येणाऱ्या लांबपल्ल्याच्या एसटी गाड्या उत्पन्न कमी आणि चालक-वाहकांची संख्या कमी असल्याचे कारण पुढे करून गेल्या दीड वर्षापासून अचानक बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाटणसह दुर्गम भागातील जनतेची मोठी गैरसोय झाली होती. कोकणातून येणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाड्यांची वाट पाहत प्रवाशांना पाटण बसस्थानकात ताटकळत बसावे लागत होते. तर खाजगी शिवशाही बसचा फायदा वाडवण्यासाठी पाटण आगाराच्या लांब पल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या. असा आरोप प्रवाशी वर्गाकडून होत होता. पाटण आगाराच्या बंद झालेल्या लांब पल्याच्या गाड्या सुरू करण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी निवेदने दिली होती. तसेच सर्वसामान्य जनतेतूनही लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती. मात्र पाटण आगार जनतेच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत होते.
एसटी महामंडळाच्या अनागोंदी कारभाराविरोधात व पाटण आगारातून लांब पल्याच्या एसटी बस पुन्हा पूर्ववत २४ नोव्हेंबर अखेर सुरु करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा पाटण तालुका पत्रकार संघाने पाटण आगार व एसटी महामंडळाला निवेदनाद्वारे दिला होता. तालुका पत्रकारसंघाच्या मागणीला समाजातील विविध संघटनांनी पाठींबा दिला होता. अखेर याची गांभिर्याने दखल घेत पाटण आगाराने लांबपल्ल्याची पाटण-पुणे ही बससेवा तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी सकाळी पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर यांच्या हस्ते पाटण-पुणे बससेवेचा शुभारंभ करून बससेवा सुरू करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना भापकर यांनी लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी आंदोलन छेडल्याने या आंदोलनाला समाजातील अनेक घटकाकडून वाढता पाठींबा लक्षात घेता आंदोलनाची तीव्रता वाढेल की काय अशी शंका वाटत होती. मात्र पत्रकार संघटना व पाटण आगाराचे अधिकारी यांनी चर्चेतून तोडगा काढला आणि एसटी सेवा पुन्हा सुरू झाली. त्याबद्दल पत्रकार व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पाटणचे आगारप्रमुख निलेश उथळे, पत्रकारसंघाचे माजी अध्यक्ष शंकर मोहिते, उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, सचिव विद्या म्हासुर्णेकर-नारकर, प्रविण जाधव, सुरेश संकपाळ, संजय कांबळे, सीताराम पवार यांच्यासह पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, यशवंतराव जगताप, शिवसेनेचे पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील, मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर, अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कोळेकर, संजय शिंदे, एसटीचे वाहक, चालक व प्रवासी उपस्थित होते.-

पाटण आगारातुन गेल्या दिड वर्षा पासुन लांब पल्याच्या एस.टी.बस बंद होत्या. मात्र या गाड्या वरीष्ट कार्यालयातुनच बंद करण्यात आल्या होत्या. चालक – वाहकांची पाटण आगाराला संख्या कमी असल्याने लांब पल्याच्या एस.टी.बसवर.परिणाम होत आहे. पाटणला पुरेसा चालक-वाहक मिळाल्यानंतर उर्वरीत बंद असलेल्या गाड्या सुरु करण्यात येतिल. पाटणला शिवशाही बस संदर्भात देखिल औनलाईन बुकींगची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पाटण आगार प्रमुख.
निलेश उथळे.