जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाला आग ; उपअभियंता एन.व्ही. गांगुर्डे यांचा आगीत होरपळून मृत्यू

 शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
सातारा : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाला आग लागून या विभागाचे उप अभियंता एन. व्ही. गांगुर्डे वय 55 यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. प्रथमदर्शनी ही आग शॉर्टर्किटने लागली असल्याचे समोर आले आहे. या आगीत विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  बुधवार दि. 26 रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागातून अचानक धुर येऊ लागल्याने तेथील रहिवाशांनी याबाबत तातडीने अग्निशामक दलाला कळविले. तत्पुर्वी तेथील रहिवाशांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न चालू केले.
दरम्यान अग्नि शामक दल घटना स्थळी येवून आगीच्या दिशेने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. धुराचे प्रमाण जास्त असल्याने दलाच्या कर्मचार्‍यांनी हातात बॅटरी घेवून आत प्रवेश केला असता. त्यांना आगीत एक होरपळलेला मृतदेह दिसला. कर्मचार्‍यांनी तात्काळ त्याची कल्पना उपस्थित अधिकार्‍यांना दिली.  या विभागातील कर्मचार्‍यांना बोलावून विचारले असता या विभागाचे उप अभियंता एन. व्ही. गांगुर्डे यांचा असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावर जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्गल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी पहाणी केली. रात्री उशीरा पर्यंत पोलीसांमार्फत घटनास्थळावरील पंचनाम्याचे काम चालू होते.
यांत्रिकी विभागाला दुसर्‍यांदा आग
सातारा जि.प. च्या जुन्या लोकल बोर्ड या इमारतीमधील यांत्रिकी विभागाच्या कार्यालयास यापूर्वी सन 2010 मध्ये अशीच आग लागली होती. यावेळी या आगीमध्ये कार्यालयातील टेबल खुर्च्या व फर्निचरचे साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेनंतर लोकल बोर्ड या इमारतीमध्ये बुधवारी सायकाळी 8 च्या सुमारास शार्ट सर्कीट होऊन आग लागून मोठे नुकसान झाले. तसेच या घटनेत यांत्रिकी विभागातील उप अभियंता यंचा आगीच्या भक्ष्य स्थानी सापडून मृत्यू झाला आहे.
कामावर थांबणे जीवावर बेतले!

 

सायंकाळी 6.45 च्या सुमारास यांत्रिकी विभागातील इतर कर्मचारी कार्यालय बंद करत असता या विभागाचे उप अभियंता एन. व्ही. गांगुर्डे यांनी कर्मचार्‍यास माझे कार्यालयात काम आहे, तुम्ही जाऊ शकता, असे सांगितले. कार्यालयाला दोन दरवाजे असल्याने अधिकारी निवासकडील बाजुचा दरवाजा कर्मचार्‍यांनी बंद करून निघून गेले. गांगुर्डे आपल्या केबीनमध्ये काम करत बसले होते. अचानक ही आग लागल्यानंतर तेथील परिसरातील लोकांना आतमध्ये कुणी आहे याची कल्पनाही नव्हती.अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणून आत प्रवेश केल्यानंतर ही दुर्दैवी घटना समोर आली. गांगुर्डे 1 ऑगस्ट रोजी सातारा जि.प.मध्ये रूजू झाले होते. दोनच महिन्यात त्यांच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला. ते मुळचे नाशिक येथील आहेत.