साताऱ्याच्या मातीचा गुणधर्म शौर्याचा म्हणून देशसेवेच्या समर्पणात अव्वल – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

सातारा, दि. 7 (जिमाका) : देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून सामान्य नागरिकांनी सढळ हाताने ध्वजदिन निधी संकलनास मदत करावे. सातारा ही भुमी शूर वीरांची आणि शौर्याची असल्यामुळे राज्यातून सर्वाधिक सैनिक या जिल्ह्याने आजपर्यंत या देशाला दिले आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. साताऱ्याच्या मातीतच शौर्याचे गुणधर्म असल्यामुळे आजपर्यंत 129 शौर्य पदक, 5 वीर चक्र आणि अनेक इतर पदके या जिल्ह्यातील विरांना मिळाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक ध्वजनिधी द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
ध्वजदिन निधी संकलन-2017 चा शुभारंभ जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते महासैनिक भवन येथे करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाप संदीप रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक गावातून देशाच्या सेवेतील तीन्ही दलात जवान काम करत आहेत. या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. या जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पत्नींनी मिळून जे बचत गट स्थापन केले आहेत. त्या बचत गटाच्यावतीने खूप चांगले काम सुरु आहे. या बचत गटांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने खासगी बसेस घेवून व्यवसायाचा अतिशय उत्तम मार्ग निवडला आहे. एवढा व्यवसाय एखाद्या बचत गटाने सुरु करावा हे उदाहरण विभागतच नव्हे तर राज्यातील दुर्मिळ आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मी त्यांचे कौतुक करत आहे. मुळातच सैनिकांकडे शिस्त, वेळेचं नियोजन या गोष्टी असल्यामुळे कोणत्याही गोष्टी हातात घेतल्यास त्या तडीस नेहण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासात यांचे योगदान मोलाचे आहे,असे गौवोद्‌गार काढून येत्या 14 ते 16 डिसेंबर रोजी साताऱ्यात होणाऱ्या सैनिक भरती रॅलीमध्ये जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात त्या कौतुकास्पद असून त्याचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे प्रतिपादन, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून या जिल्ह्याची महती लढवया सैनिकांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यतून अनेक वीर जन्माला आहे आणि त्यांनी देशासाठी बलीदान केले. अजुनही शेकडो युवक सैन्यामध्ये भरती होत आहेत. हे कौतुकास्पद आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांच्या मुलांना अधिकाधिक प्रोत्साहन देवून अधिकारी करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
माजी सैनिकांसाठी, शहीद जवानांच्या कुटूंबीयांसाठी वेगवेगळे व्यवसाय, उद्योग उभे करुन देवून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज असून त्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरु आहेत. नुकतेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या मदतीने माजी सैनिकांच्या पत्नींच्या बचत गटांना बसेस घेवून दिल्या आहेत. यापुढेही असे व्यवसाय उभे करुन देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.
प्रारंभी सशस्त्र सेना ध्वजदिन-2017 निधीचे संकलन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते मदत देवून सुरु करण्यात आले. यावेळी माजी सैनिकांच्या विविध क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातून ध्वज संकलन निधी 2 कोटी रुपये एवढे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांना ध्वज संकलन निधीसाठी मदत करायची असल्यास या आयडीबीआय बॅकेच्या 0451104000210089 IFSC IBKL 0000451 या खाते क्रमांकावर थेट मदत करु शकता.

यावेळी ल्हासुर्णे गावातील दोन महिला बचत गटांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश ध्वजदिन निधीस यावेळ दिले. या कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.