सुंदरगडचा “दंतगिरी”

पाटण:- ( शंकर मोहिते ) – पाटण पासून पश्चिमेस असलेला पाटण महालाचा प्रमुख असलेल्या सुंदरगडावर ( घेरादात्तेगड ) गडाच्या पश्चिमेच्या बाजूस प्रवेशद्वारात काळ्या कातळात कोरलेला इतिहासीक श्री “दंतगिरी” गणपती सुंदरगडाचे तलवार विहीरी एवढेच मुख्य आकर्षण आहे. या “दंतगिरी” च्या अगदी बाजूला वीर हनुमान आहे. इतिहासीक सुंदरगडावरील या मुर्ती आजही दुर्ग प्रेमिंना सुस्थितीत पहायला मिळतात.

सुंदरगडावर प्रत्येक दिवसाच्या सुर्याचा उदय “दंतगिरी” च्या दर्शनाने होतो.तर दिवसाचा अस्त वीर हनुमानाच्या दर्शनाने होतो. अशा कल्पक धाटणीत बांधलेले गडाचे प्रवेशद्वार त्या इतिहासातील कलाकारांची बौध्दीकता जाणवून देते. या “दंतगिरी” गणपतीची उंची सरासरी पाच ते साडेपाच फूट आहे. तर रुंदी चार फूट आहे. हि मूर्ती बैठी स्वरुपात असून मुकुटावर नागफणी आहे. दोन्ही कान जास्वंदी फुलांच्या पाकळीच्या आकाराचे आहेत. सोंड डाव्या बाजूला वळलेली असून डाव्या हातातील मोदकावर आहे. पोटावर शेषनागाचा तिढा असून पायात वाळा तर पाठीमागील दोन्ही हातात शस्त्रधारी आहे. गणेश चतुर्थी काळात या बरोबर अंगारकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणेश भक्तांची गडावर “दंतगिरी” दर्शनासाठी गर्दी होते.
सुंदरगड पाटण महालाचा प्रमुख किल्ला ओळखला जातो. या किल्ल्याच्या निगराणीत प्रचितगड, भैरवगड, जंगलीजयगड, वासोटा किल्ला, गुणवंत गड आणि वसंत गड हे येत होते. कोकणाच्या प्रमूख मार्गावर असणारा सुंदरगड छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर मराठा मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. या मार्गावरील कोणत्याही मोहिमेअगोदर छत्रपती आणि मराठा सैन्याकडून सुदरगडावरील “दंतगिरी” वीर हनुमान, आणि तलवार विहीरीतील शिवलिंगाचे दर्शन घेऊन मोहिमेस प्रारंभ केला जाईचा. असे विशेष महत्त्व असलेल्या सुंदरगडावर इतिहास प्रेमी पर्यटकांची गर्दी होत असताना दिसतें. सुंदरगड सद्या विविध फुलांनी बहरलेला असून या फुलांबरोबर येथील निसर्ग परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.