१५१वर्षांच्या परंपरेचा हेळगांवचा नवसाला पावणारा श्रीगणेशा

 

पुसेसावळी(प्रतिनिधी) :- हेळगाव(ता.कराड) येथे विसाव्या शतकापासून गोपाळ कुलकर्णी यांनी गणपती उत्सव सुरु केला.याला सुमारे १५१ वर्षांची परंपरा आहे.

त्यावेळी बारा बलुतेदार समाजबांधव हा उत्सव साजरा करत असत.त्याकाळात वर्गणी स्वरूपात १ शेर ज्वारी, व २५ पैसे प्रत्येक घरातून गोळा करुण त्यातून उत्सवाचा खर्च भागविला जात असे. गावच्या पूर्वेला प्राचीन शिवकालीन मंदिर आहे;त्याच मंदिरात श्री गणेशाची स्थापना केली जाते. गणपती उत्सवाच्या प्रथम वर्षापासून ते आजपर्यंत श्रींची मूर्ती हि पूर्णपणे शाडूची असते. गणेश चतुर्थीच्या स्थापनेपासून दररोज गणेशाची पुजा-अर्चा अगदी मोठया भक्तिभावाने केली जाते.
या उत्सव काळात संपूर्ण सातारा जिल्ह्यातील तसेच काही प्रमाणात जिल्ह्याबाहेरील हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी हजेरी लावतात,गणेशा नवसाला पावणारा असल्यामुळे येणारे भाविक-भक्त आपापल्या इच्छेनुसार श्रींच्या चरणी दान देत असतात;त्यातूनच यात्रेचा खर्च करून उर्वरित रक्कमेतुन गावच्या विकासाला हातभार लावला जातो. पूर्वी येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण श्रावण महिन्यात होत असे; पण अलीकडच्या काळात गावचे पारायण गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत असते. भाद्रपद कृष्ण द्वितीयेला म्हणजेच (अनंत चतुर्दशीच्या तिसऱ्या दिवशी) पहाटे श्री गणेश मूर्ती रथामध्ये बसवून पाराजवळ स्थानापन्न केली जाते.गणपती पुढे प्रथेप्रमाणे तमाशाची गणगौळण होते आणि त्यानंतर विसर्जनाची सवाद्य मिरवणूक निघते.मिरवणुकीत अबालवृद्ध स्त्री-पुरुष मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात.मिरवणुकीनंतर श्रींचे विसर्जन करून त्यानंतर हेळगाव(ता.कराड) गावची गणेशाची यात्रा भरते.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी 13 रोजी गणेश चतुर्थीला श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे,प्राणप्रतिष्ठा करण्यापुर्वी गावातून पालखीतून श्री गणेशाची मिरवणुक काढली जाते,मिरवणुकीत दर्शनासाठी गर्दी होत असते,
गणेश विसर्जन व हेळगाव(ता.कराड) गावची गणेश यात्रा अनंत चतुर्दशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २६-९-२०१८ला संपन्न होत आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.