जिल्ह्यात 522 गावात एक गाव एक गणपती

सातारा (एकनाथ थोरात) : सातारा जिल्ह्यात यावर्षी एकूण 29 पोलीस ठाण्यांतर्गत 522 गावात एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापनाा झाली असून या पाठीमागे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा प्रभाव असल्याचे सिध्द झाले आहे. एक गाव एक गणपतीच्या संकल्पनेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची मदत मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे पो. नि. गुंजवटे व पोलीस कर्मचारी यादव यांनी दै. ग्रामोध्दारशी बोलताना दिली आहे.
या वर्षीचा गणेशोत्सव दि. 13 ते 23 सप्टेंबर या काळात होत असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्हा पोलीस दलाच्यावतीने गणेश मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ यांची बैठक प्रत्येक पोलीस ठाण्याचे कारभारी यांच्या उपस्थितीत घेवून प्रबोधन करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थ व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे एक गाव एक गणपती अंतर्गत सातारा शहर पोलीस ठाणे 1, सातारा तालुका 41, कोरेगाव 17, कराड तालुका 34, बोरगाव 17, तळबीड 3, उंब्रज 25, वाई 33, महाबळेश्‍वर 16, पाचगणी 14, मेढा 74, भुईंज 25, कोरेगाव 12, पुसेगाव 24, रहिमतपूर 10, वाठार 22, वडूज 12, दहिवडी 23, म्हसवड 16, औंध 7, फलटण शहर 1, फलटण ग्रामीण 6, लोणंद 18, खंडाळा 10, शिरवळ 13, पाटण 26, कोयना 14, ढेबेवाडी 25 या प्रमोण सातारा जिल्ह्यातील एकूण 29 पोलीस ठाण्यांतर्गत 522 गावात बाप्पा ची एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना गुरुवारी करण्यात आली आहे. या शिवाय जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 5070 मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे यावर्षीही गणराया आवार्ड स्पर्धा ठेवली असून गणेशोत्सव शांतेत पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 29 पोलीस ठाण्याचे कारभारी याची संयुक्त बैठक घेवून यापूर्वीच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली होती.
यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले होते. आतापर्यंत जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने सहा जणांचा बळी गेला आहे. ऐन गणेशोत्सवच्या तोंडावर स्वाईन फ्ल्यूचे संशयीत सापडल्याने वैद्यकीय विभागही खडबडून जागा झाला आहे. सध्या वातावरणात बदल होवून उन्हाची तीव्रता वाढू लागलल्याने स्वाइन फ्ल्यूचे विषाणू उन्हाच्या तीव्रतीने मरु लागले आहेत. हौद, टायरमधील साचलेले पावसाचे पाणी जमिनीवर फेकून देवून स्वच्छ वातावरण ठेवण्यासाठी प्रत्येकाने लक्ष पुरवावे, पर्यावरण पुरक व आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.