खेळ मांडियेला…क्रीडा गणेश

सातारा : सातारा शहरातील सदाशिवपेठेतील खण आळीत राहणार्‍या आणि न्यायालयातून सेवानिवृत्तीनंतरही निवृत्त न होता खर्‍या अर्थाने रिचार्ज झालेल्या हरहुन्नरी कलाकार, संगीत समीक्षक व जून्या गाण्यांची विशेष आवड असणार्‍या व त्यावर आजवर शेकडो लेख लिहणार्‍या लेखक, समिक्षक अशा पद्माकर पाठकजी यांनी आपल्या घरात सालाबादप्रमाणे अनोखा गणपती व त्याची आरास साकारली आहे.
नुकत्याच झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धांचे औचित्य लक्षात घेवून विविध खेळांची माहिती सांगणारा हा क्रिडा गणेश विशेष लक्षवेधक ठरत आहे. याबद्दल माहिती देताना पद्माकर पाठकजी म्हणाले की, ज्ञानगणेश आणि संगीत गणेश या सलग दोन वर्षांच्या सजावटीनंतर यंदाही सातार्‍याच्या घरी काही तरी वेगळी थीम घेऊन सजावट करण्याचा विचार सुरू होता. रशियात यंदाच्या वर्षी झालेला फुटबॉल विश्वचषक, जकार्तामध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांच्या पार्श्वभूमीवर क्रीडा गणेश साकारण्याची कल्पना काही महिन्यांपूर्वी सुचली आणि मग आम्ही सगळेच कामाला लागलो. घरात सध्या कोणीही चॅम्पियन नसताना, क्रीडा संस्कृतीचे वातावरण  नसतानाही हा विषय एक आव्हान म्हणून मांडायचे निश्चित केले. बैठ्या, मैदानी, साहसी अशा विविध 21 क्रीडा प्रकारांचे साहित्य गोळा करण्याचे ठरवले. त्यात सारीपाट, लगोरीपासून ते अगदी दांडपट्टा, ढाल तलवारीपर्यंत आणि सापशिडी, कॅरम, बुद्धिबळापासून ते क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, गोल्फपर्यंत खेळांचं साहित्य गोळा केलं. जे खेळ कोणत्याही साहित्याशिवाय खेळले जातात. त्यांच्या छोट्या प्रतिकृती केल्या. काही पारंपरिक खेळांची चित्रही काढून घेतली. सजावटीच्या पार्श्वभूमीसाठी मैदान गाजवणार्‍याफ भारतीय खेळाडूंची छायाचित्रेही कोलाज करून वापरण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे लोगो, शुभंकर यांचा वापर असलेली पृथ्वीही या सजावटीत समाविष्ट केली. सजावटीला पूरक म्हणून क्रीडाविषयक पुस्तके, क्रीडाविषयक चित्रपटांची पोस्टर्स, जुनी नियतकालिके, वृत्तपत्रांचे अंक असं सारं काही विविध ठिकाणहून गोळा केलं. निवडक 21 खेळांच्या माहितीचे एकत्रीकरणही केले आणि या सजावटीच्या निमित्ताने क्रीडा संस्कृती जपणार्‍या सातार्‍यातील महत्त्वाच्या संस्थांची नोंदही घेतली.
 विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सातार्‍यातील खेळाडूंची यादीही अथक प्रयत्नांनी तयार केली. क्रीडा या क्षेत्राचा विस्तार प्रचंड असल्यामुळे सर्व गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आलेला नाही, काही महत्त्वाच्या खेळांची माहिती, साहित्य जमा करणे शक्य झाले नाही. जागेच्या आणि इतर मर्यादा होत्याच. तरीही ही सजावट परीपूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या अथक प्रयत्नांतून क्रीडा गणेश साकारला. हा सारा खेळ मांडायला अनेक हातांचे सहकार्य लाभले. अनेकांनी मदत केली, त्यांच्या सहकार्याशिवाय हा क्रीडा गणेश साकारणे निव्वळ अशक्य गोष्ट होती.