गणेश विसर्जनावरून जिल्हाधिकार्‍यांनी फटकारल्यानंतर सातारा पालिकेची विशेष सभा

सातारा : मंगळवार तळे येथे विसर्जनावरून जिल्हाधिकार्‍यांनी फटकारल्यानंतर सातारा पालिकेची बुधवारी सकाळी अकरा वाजता विशेष सभा बोलवण्यात आली आहे. या बैठकीत  उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार्‍या याचिकेबाबत पुनर्विचार करावयाचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार तळ्याचे भवितव्य आता न्यायालयाच्या आदेशानंतर स्पष्ट होणार आहे.
सातारा पालिकेचे पदाधिकारी उच्च न्यायालयात स्वतःच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे अडचणीत आले आहेत. तळयांमध्ये विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाची मनाई आणि मंगळवार तळ्यात गणपती विसर्जनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट दिलेला नकार त्यामुळे कृत्रिम तळ्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला पण भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी त्याला विरोध दर्शवल्याने पालिकेची चहूबाजूनी कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी कायदेशीर चाचपणी सुरू झाली असून उच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र देण्यासाठी वकिलांना पाचारण करण्यात आले आहे. त्याकरिता पालिकेचा ठराव गरजेचा आहे त्यासाठी पालिकेत बुधवारी सकाळी अकरा वाजता तातडीची विशेष सभा बोलवण्यात आली आहे.
या सभेचे आमंत्रण तातडीने नगरसेवकांना व्हॉटस अ‍ॅपवरून देण्यात आले तसेच अजेंडा ही घाईघाईने रवाना करण्यात आला. आता प्रतिज्ञापत्र काय दाखल करायचे यावर विशेष सभेत एकमताने राजकीय खलं करावा लागणार आहे.
मुख्याधिकार्‍यांची अघोषित सुट्टी
जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीतच घेतलेली हजेरी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी भलतीच मनाला लावून घेतली. पदाधिकार्‍यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी रजेवर जातो असे सांगणार्‍या गोरेंनी खरोखर कोणालाच न सांगता बाहेर राहणे पसंद केले. पालिका अडचणीत असताना मुख्याधिकार्‍यांनी पालिकेकडे न फिरकणे या विषयी नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केलेल्या फोनला सुद्धा गोरे यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.