मंगळवार तळ्यावर राज्य राखीव दलाची तुकडी तैनात 

सातारा : सातार्‍यात शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीच्या मंगळवार तळ्यावर राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली.  या बंदोबस्ताच्या सातार्‍यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. याच तळ्यावर विसर्जन करण्याची ठाम भूमिका घेतल्याने खा. उदयनराजे भोसले यांचा प्रशासनाशी खटका उडण्याची चिन्हे आहेत.
गुरुवारी पोलिस प्रशासनाकडून मंगळवार तळे वगळून कण्हेर, गोडोलीसह सात तळ्यात गणेश मूर्तीचे विसर्जन होणार असल्याचे जाहीर केले मात्र या निर्णयाला कार्यकर्त्यानी नापसंती दर्शवली. मात्र शुक्रवारी सकाळीच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशाने राज्य राखीव दलाची तुकडी तळ्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर तैनात झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
सातार्‍यात श्री विसर्जनाने राजकीय वळण घेतले आहे. दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाची शक्यता लक्षात घेउन तळ्यावर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यंदा श्री विसर्जनाचा मुद्दा मंगळवार तळ्याच्या निमित्ताने फारच संवेदनशील झाला आहे. प्रदूषणाचे कारण देउन न्यायालयात याचिका दाखल झाल्याने व कृत्रिम तळ्यासाठी जागा च पालिकेला उपलब्ध न झाल्याने श्री विसर्जनाची अडचण झाली. सुशांत मोरे यांच्या 2015 च्या याचिकेवर उच्च न्यायालयाने जैसे थे म्हणत खाजगी मालकीमुळे मंगळवार तळ्यावर कोणतेही भाष्य केले नाही. हीच मेख अडचणीची ठरल्याने विसर्जन तळ्यात होणार की नाही या संभ्रमात कार्यकर्ते होते. मात्र उदयनराजे भोसले यांनी ही कोंडी त्यांच्या पातळीवर सोडवली आहे.