रिसालदार तळ्याचा चेंडू जिल्हाधिकार्‍यांचा कोर्टात ; नवीन पोलीस अधिक्षकांची मनधरणी करणार कोण ?

सातारा : ऐतिहासिक रिसालदार तळ्यात श्री विसर्जनाला नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मनाई केल्याने सातारा पालिकेची कोंडी झाली आहे. प्रश्न हाताबाहेर गेल्याने तळ्याचा चेंडू आता पालिकेने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या कोर्टात ढकलला आहे. या पेचावर मार्ग काढण्याची विनंती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केल्याने सोमवारी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठक बोलवण्यात आली आहे.
रिसालदार तळ्याला आधी परवानगी नंतर नकार असा प्रकार जिल्हा पोलीस दलाकडून झाल्याने सातारा पालिकेची श्री विसर्जनाच्या मुद्यावर तारांबळ झाली आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे पंचवीस दिवस उरले आहेत. नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना तळे देता येणार नाही असे कळवले. त्यामुळे गणरायाच्या आगमनाआधी विसर्जनाचा मुद्दा सालाबादाप्रमाणे ऐरणीवर आला आहे. त्यात पालिकेची अद्याप काहीच तयारी नाही. मीटर कनेक्शन जेसीबी इतर तांत्रिक परवानग्या तळ्याअभावी खोळंबून पडल्या आहेत. चक्क नकार आल्याने पोलीस अधीक्षकांची मनधरणी कोणी करायची? ही पालिकेची अडचण आहे. त्यात उदयनराजे भोसले सुध्दा सातार्‍यात नाही. आता तळ्याचा पेच प्रशासनाच्या पातळीवरचा असल्याने पालिका हतबल आहे म्हणून थेट जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हस्तक्षेप करावा त्यांनी देशमुख यांच्याशी चर्चा करून रिसालदार तळे मोकळे करून दयावे अशी तयारी पालिकेत दिवसभर सुरू होती. मुख्याधिकारी गोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेउन त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. सोमवारी या प्रश्नावर बैठकीतून तोडगा काढला जाणार आहे. याकरिता पंकज देशमुख यांनाही पालिका पदाधिकार्‍यांसह पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान शनिवारी दुपारी काही हिंदुत्ववादी संघटनांनी निवासी जिल्हाधिकारी सचिन बारावकर यांची भेट घेऊन रिसालदार तळ्याला परवानगी देण्याची विनंती केली.
चौकट- रिसालदार तळेच सध्या पर्याय ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारा शहराचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग झालेत. कृत्रिम तळ्याच्या पर्यायासाठी काही जण उतावळे झालेत पण पुन्हा त्यासाठी पन्नास लाखाचा फटका बसणार . आणि भुसभुशीत मातीची योग्य ठिकाणची जागा सुध्दा उपलब्ध नाही. त्यामानाने रिसालदार तळे हा योग्य पर्याय आहे. नगरपालिका – राजवाडा – कर्मवीर पथ या मार्गाने विसर्जन मिरवणूक आणून मुख्यालय लगतच्या फाटकाने श्री मूर्ती ट्रॅक्टरने आत आणणे सहज शक्य आहे. तळ्याची खोली पाहता मोठया गणपती विसर्जनासाठी हे योग्य स्थळ आहे . तळे पुन्हा स्वच्छ करून जैसे थे ठेवण्यासाठी  पालिका प्रशासन तयार आहे. त्यामुळे रिसालदार तळेच योग्य पर्याय असल्याचा मतप्रवाह पुढ आला आहे.