Tuesday, April 16, 2024
Homeठळक घडामोडीआता गावठाण येणार अधिकृत रेकॉर्डवर; अतिक्रमणाला बसणार चाप

आता गावठाण येणार अधिकृत रेकॉर्डवर; अतिक्रमणाला बसणार चाप

सातारा : अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाच्या आधारावर माण व खटाव तालुक्यातील सर्व गावठाणांची मोजमाप, नकाशा व आखिव पत्रिका तयार करण्यात येणार आहे. हा पथदर्शी कार्यक्रम असून यातून गावठाणांचे दस्तऐवज तयार होऊन नागरिकांना त्यांचे मालमत्ता पत्रक देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी व वेळेत पूर्ण करावा. या कार्यक्रमच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या मालमत्ता पत्रकाबरोबर गावठणांचा विकास करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्राज्ञानाच्या आधारावर मोजमाप करण्याचा पथदर्शी कार्यक्रम माण व खटाव तालुक्यात राबविण्यात येणार आहे. याबाबतची कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशिय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी श्वेता सिंघल,मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तरवेज, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे, असे सांगून जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम पुढे म्हणाले, प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी बैठक आयोजित करुन हा कार्यक्रम यशस्वी राबविण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करावी. यासाठी लवकरात लवकर ग्रामसभेंचे आयोजन करावे. संबंधित अधिकार्‍यांनी कामाची प्रगतीच्या माहिती व्हावी यासाठी एक व्हॉटस्अप ग्रुप तयार करावा.
मोजणी ज्या गावठाणाची मोजणी अत्याधुनिक ड्रोन होणार आहे त्याच्या दोन-तीन दिवस अगोदर गावात मोजणीबाबत जनजागृती करावी. मोजणीच्या वेळी संबंधित अधिकार्‍यांनी उपस्थित रहावे. अत्याधुनिक ड्रोन मोजणीचे फायदे जनतेला व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रचार व प्रसार करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांच्या तक्रारीसाठी जिल्हा परिषदेमध्ये कक्ष स्थापन करावा. अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावठाणाची मोजणी होणार आहे, या कामात स्वत:ला झोकून द्या, तुमचे काम राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शेवटी व्यक्त केला.
अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्राज्ञानाच्या आधारावर माण व खटाव तालुक्यातील सर्व गावठाणांची मोजमाप करण्यात येणार असून हा पथदर्शी कार्यक्रम आहे. ड्रोन मोजणीच्या वेळी तलाठी यांनी गावठाणाची माहिती बरोबर ठेवा. शासकीय मिळकतीवर अतिक्रमण असल्यास तशी नोंद घ्या. या कार्यक्रमाचा गावनिहाय आढावा घेणार आहे. कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वयाने कामे करावीत. कार्यक्रमाची माहिती ग्रामसभेत द्या व शंभर टक्के सर्व्हे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या कार्यशाळेत केल्या.
अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावठाणाचे मोजमाप होणार आहे. हे काम आव्हानात्मक आहे. गावठाणाचे मोजपमाप झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास करणे सोपे होणार आहे. हा कार्यक्रम माण व खटाव तालुक्यात यशस्वीपणे राबवू, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल.
गावठाण भूमापन योजनेमुळे होणारे फायदे
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या कराच्या व्याप्तीत येतील. यामुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होईल. ग्रामपंचायतकडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक (8अ) नोंदवही आपोआप तयार होईल. कर आकारणी आपोआप अद्यावत होणार आहे. गावठाणाचे हद्दीतील प्रत्येक मिळकतीचा नकाशा तयार होईल व प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्चित होतील.गावठणातील प्रत्येक मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल.गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकीहक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होईल. ग्रामस्थांचे नागरी हक्कांचे संरक्षण होईल. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल.मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल.
ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. गावातील मालकी हक्क व हद्दीबाबतचे वाद मिटतील. प्रत्येक धारकांच्या जागेचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होईल. मिळकत पत्रिकेस शेतीच्या 7/12 प्रमाणेच धारकाचे मालकी हक्काचा पुरवा म्हणून कायदेशीर दृष्ट्या मान्य आहे. या कार्यशाळेस विविध विभागांचे अधिकारी, माण व खटाव तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular