मारुल तर्फ पाटण येथे गॅस्ट्रोची साथ…; साथीत साडेतीन वर्षाच्या जानवीच्या दुर्दैवी मृत्यूने खळबळ..

पाटण :- मारुल तर्फ पाटण येथे सुतार वस्तीतील जानवी संजय लोहार या साडेतीन वर्षाच्या बालिकेचा गॅस्ट्रोच्या साथीने रविवारी दुर्दैवी म्रुत्यु झाला. या साथीत गावातील ८० ते ८५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असताना तिसऱ्या दिवशी मंगळवारी आणखी वीस जणांना लागण झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. या सर्वांवर शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जणांवर घरीच उपचार सुरु आहेत. मयत बालिकेच्या मोठ्या बहिनीलाही गॅस्ट्रोची लागण झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालय पाटण येथे उपचार सुरु आहेत. गॅस्ट्रोच्या साथीने सुतार वस्तीतील साडेतीन वर्षाच्या बालिकेच्या म्रुत्युने एकच खळबळ उडाली असताना अद्याप या वस्तीत कोणताही आरोग्य अधिकारी कर्मचारी फिरकला नाही तर आरोग्य सुविधाही राबविली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

गॅस्ट्रोने मयत झालेल्या बालिकेच्या घरी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी भेट देऊन स्थानिक नागरीकांकडून या गॅस्ट्रोच्या साथी बाबत परस्थिती जाणून घेतली. यावेळी वस्तीतील उपस्थित महिलांनी बोलताना सांगितले गावातील सार्वजनिक नळांना चार आठ दिवसातून एकदा पाणी येते तेही गढूळ असते. गॅस्ट्रोची साथ सुरु झाल्यापासून या सुतार वस्तीत कोणीही जबाबदार अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी अथवा पदाधिकारी फिरकला नाही. तसेच कोणतीही आरोग्य सुविधा पुरवली नाही. गावात आरोग्य उपकेंद्र आहे मात्र ते आमच्या काहीएक उपयोगाचे नाही. गरीब घरातील साडेतीन वर्षाची हसती खेळती जानवी या बालिकेचा गॅस्ट्रोच्या साथीत दुर्दैवी मृत्यू झाला. तरीदेखील त्या गरीब कुटुंबाला मानसिक धीर द्यायला कोणीही ईकडे फिराकले नाही. आज जानवीची मोठी बहीण पुनम संजय लोहार – वय – १० हिलाही गॅस्ट्रोची लागण झाली असून तिच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिच बालिका श्रीमंतांच्या घरची लेक असतीतर अनेकांनी त्यांच्या घरचे उंबरठे झिझवले असते अशा संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी यावेळी बोलताना दिल्या.

यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांनी सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांना संपर्क करून मारुल तर्फ पाटण येथील गॅस्ट्रोच्या साथीबाबत गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांना आरोग्य सुविधा पूरवा अशा सूचना केल्या. आणि आरोग्य सुविधा अभावी गाफील राहिलेल्या स्थानिक प्रशासन, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करा.. तसेच मयत बालिकेच्या गरीब कुटुंबियांना शासनाने किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशा स्वरुपाची मागणी केली. यावेळी फत्तेसिंह पाटणकर यांच्यासह सुतार वस्तीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट:- मारुल तर्फ पाटण या गावात गॅस्ट्रोची साथ शंभरच्या वर नागरिकांना झाली आसताना दोन दिवस रुग्णांना खाजगी वाहनाने रुग्णालयापर्यंत जावे लागले. आरोग्य विभागाने कोणतीही सुविधा रुग्णापर्यंत पोहचवली नाही. विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वतः रुग्णवाहिका बोलवून गॅस्ट्रो बाधित रुग्णांची रुग्णालयात उपचारासाठी जाण्याची व्यवस्था करून दिली.