दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना गटशेती फायदेशीर : प्रभाकर देशमुख


वडूज : खटाव-माण सारख्या दुष्काळी तालुक्यातील शेतकर्‍यांना गट अथवा समुह शेतीसारखा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. असे मत निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
पंचायत समितीच्या बचत सभागृहात आयोजित केलेल्या गटशेती कार्यशाळेत ते बोलत होते. सभापती संदिप मांडवे, उपसभापती कैलास घाडगे, तहसिलदार संदेश बेल्लेकर, प्रवीण सुरोडकर, प्रा. बंडा गोडसे, अनुराधा देशमुख, दिपक देशमुख, संतोष साळुंखे यांची उपस्थिती होती.
श्री. देशमुख म्हणाले, गटशेती करताना सदस्यांनी गटाबद्दल आत्मीयता बाळगली पाहिजे. किमान 20 शेतकर्‍यांचा एक गट असावा. गटातील किमान दोन सदस्यांनी शेतीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले पाहिजे. गटातील सदस्यांनी एकतरी कॉमन पिक घेतले पाहिजे. या पिकाबद्दल लागवडीपासून काढणीपर्यंतच्या तंत्रज्ञानाची माहिती असावी. प्रत्येकाने एकरी, हेक्टरी उत्पादनावर भर दिला गेला पाहिजे. उत्पादित झालेल्या मालाचे ग्रेडिएशन करावे. मार्केटींग व इतर प्रक्रियेवर बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.
    सभापती संदिप मांडवे म्हणाले, खटाव तालुक्यात गटशेती ही चळवळ व्हावी याकरीता आपण स्वत: व्यक्तीगत लक्ष घालणार आहे. या विषयावर काम करु इच्छिणार्‍या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पंचायत समितीशी संपर्क साधावा. होतकरु शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. विनय पोळ यांनी सुत्रसंचालन केले. महादेव जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास मांडवे येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पाटील, उंबर्डेचे शिवाजी पवार, संजय पवार, शरद कदम, ज्ञानेश्‍वर शिंदे, शशिकांत जाधव, बाळासाहेब पोळ, जितेंद्र फडतरे आदिंसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  दरम्यान पंचायत समितीच्या सभागृहात समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कार्यशाळाही उत्साहात पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय पाटील, तहसिलदार श्री. बल्हेकर, जि. प. सदस्या सुनिता कदम, आनंदराव भोंडवे, प्रा. साबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. संजय पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.