वैद्यकीय महाविद्यालयाच्या या यशाचे सर्व श्रेय सातारकरांना : श्री.छ.खा.उदयनराजे भोसले

सातारा :  सातारच्या कृष्णा खोरे पाटबंधारे विका महामंडळाची कृष्णानगर परिसरातील सुमारे 25 एकर जागा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे कायमस्वरुपी, विनामुल्य व विनाअट हस्तांतरीत करण्यास आज राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिल्याने, सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न सुटला असून, लवकरच वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यास सुरुवात होईल. राजकीयदृष्टया कुणी कितीही आडकाठी घातली तरी अखेर सातारच्या लढावू बाण्याच्या निस्वार्थी प्रयत्नांना यश आले असून, वैद्यकीय शिक्षण  घेणार्‍या पुढील पिढयांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचा  ठरणारा निर्णय झाला आहे, याबद्यल मुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना.गिरिष महाजन यांचे आम्ही विशेष आभार मानतो, वैद्यकीय महाविद्यालयाच्या या यशाबद्यल आम्ही सर्व सातारकरांना श्रेय देतो अशा उत्स्फूर्त परंतु भावनीक शब्दात सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे जागा मंजूरीच्या निर्णयावर मार्मिक भाष्य केले आहे.
याविषयी अधिक माहीती नमुद करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे म्हटले आहे की, सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहीजे याकरीता सर्वप्रथम आम्ही मागणी करुन पाठपुरावा केला होता. वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी करता, 500 खाटांचे सलग्न रुग्णालय आवश्यक होते. त्याकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करुन घेण्यात आले.  त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला गती मिळाली.
दरम्यानच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे शासनाने मंजूर केले परंतु जागेचा प्रश्‍न होता. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वैद्यकीय महाविद्यालयाकरीता सलग25 एकर जागा आवश्यक होती. त्याकरीता विद्यमान शासकीय रुग्णालयाची अपुरी जागा लक्षात घेवून, म्हणून खावली येथील जागा प्रस्तावित केली गेली.
तथापि खावली ते शासकीय रुग्णालयाचे अंतर पहाता, त्याऐवजी जलसंपदा विभागाची कृष्णानगर येथील जागा आम्ही सुचविली. सदर जागा हस्तांतरण करण्यासाठी अनेकवेळा आम्ही पाठपुरावा केला.
परंतु श्रेयवादाचे राजकारण आड येत असावे. तथापि आम्ही सातारी बाण्याचा सातत्याने पाठपुरावा सुरुच ठेवला.  राज्याचे मुख्य मंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची ज्या ज्या वेळी आमची भेट झाली त्या त्या वेळी आम्ही मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मांडला.
दि.24 फेब्रूवारी 2018 रेाजी आमच्या वाढदिनी सुध्दा त्यांना मेडिकल कॉलेज, हद्यवाढ व किल्ले अजिंक्यतारा करीता 25 कोटी निधी अशा तीन प्रमुख मागण्या आम्ही त्यांच्या कडे केल्या होता, त्यावर भाष्य करताना, मा.मुख्य मंत्री यांनी या तीनही बाबीची पुर्तता लवकरच होईल असे देखिल आश्‍वासन दिले होते. मध्यंतरीच्या काळात आमची वर्षा निवासस्थानी भेट झाली  त्यावेळीही हा विषय आम्ही काढल्यावर, महाराजसाहेब, 15 दिवसांत निर्णय घेतो असा शब्द आम्हाला त्यांनी दिला होता. हा दिलेला शब्द त्यांनी पाळला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा तिढा देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरिष महाजन यांनी सोडवताना, आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत, जलसंपदा विभागाची सुमारे 25 एकर जागा विनाअट आणि विनामुल्य तसेच कायमस्वरुपी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्यास मंजूरी प्रदान केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला जागा हस्तांतरीत झाल्याने, तसेच 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय 31 जानेवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार मंजूर असल्याने,येत्या दोन-एक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करुन, वैद्यकीय महाविद्यालयात सन  2021 ची  प्रवेश प्रक्रीया राबविणेबाबत आमचे कसोशीचे प्रयत्न राहीतील.
सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे मेडिकलला जाणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना अधिक संधीचे नवे दालन उपलब्ध होईल याचे फार मोठे आत्मिक समाधान वाटते,  असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.