चाफळला सीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

चाफळ : चाफळ ता. पाटण येथे रविवार दि.14 जानेवारी रोजी भरणार्‍या सीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून महिलांची वाढती संख्या लक्षात घेता या यात्रेमध्ये शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने ठोस उपाय योजना करण्यात आली असून यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका बजावावी असे आवाहन उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी केले
चाफळ येथील राम मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या सीतामाई यात्रा शासकीय नियोजन बैठकीत गुंजवटे बोलत होते. यावेळी तहसील कार्यालयातील सर्कल ऑफिसर के. टी. वाघमारे, चाफळ पोलीस दूरक्षेत्राचे गणेश भोसले, सरपंच अलका पाटील, अंकुश जमदाडे, व्यवस्थापक बा. मा. सुतार, विश्वस्त चंद्रकांत पाटील, तलाठी एस. एस. दुधगावकर, अमोल पांचाळ, पोलीस पाटील सागर चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव चंदुगडे यांची उपस्थिती होती.
गुंजवटे म्हणाले, दक्षिण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळाचा मबफ दर्जा मिळालेल्या चाफळ येथील सीतामाईच्या यात्रेला सुमारे तीन दशकांची परंपरा असून या ठिकाणी वसा घेऊन येणार्‍या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या दृष्टीने श्रीराम देवस्थानचे माध्यमातून सीतामाई दर्शन, पिण्याचे पाण्याची व्यवस्थेसह मंदिराचे परिसरातील शेतांमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा नियोजनास राम पेठेमध्ये दुतर्फा दुकाने, स्टॉल, आरोग्य सेवा व दिवसभर पिण्यासाठी गावांमध्ये पाणी व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. यात्रेसाठी पोलीस व आरएसपी मुलांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांची संबंधित खात्याने तपासणी करावी. गॅस सिलेंडरची ही तपासणी करावी. आरोग्य विभागाने पिण्याचे पाण्याची ओटी टेस्ट घ्यावी.
यात्रेसाठी कोरेगाव, महाबळेश्वर, सातारा, कराड, पाटण आगारातून भाविकांच्यासाठी पुरेशा बसगाड्यांची सोय केली असल्याची माहिती पाटण आगारप्रमुख निलेश उथळे यांनी दिलि. भाविकांसाठी दोन आरोग्य पथके सज्ज करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विद्या पाटील यांनी दिली. या दिवशी कराडच्या संगीत गायिका अलपिनि जोशी यांचा दुपारी तीन ते पाच या वेळेत सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी व व्यवस्थापक बा मा सुतार यांनी केले आहे.
ट्रस्टच्या वतीने महिलांना सीतामाईचे दर्शन घेता यावे, यासाठी बॅरिकेट रांगेचे नियोजन करण्यात आले असून वसा पूजनासाठी समर्थ सभागृह खुले आहे.