सातार्‍यात शुक्रवारपासून चार दिवस रंगणार 18 वा ग्रंथमहोत्सव

सातारा : सातारा पॅटर्न म्हणून राज्यात नावारुपाला आलेला सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे यंदाचे 18 वे वर्ष असून यावर्षी 13 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मैदानावर ग्रंथमहोत्सव होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
ग्रंथमहोत्सवाची सुरुवात शुक्रवार 13 जानेवारी रोजी सकाळी ग्रंथदिंडीने होणार असून यात 9 शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडीत विविध विषयावरील चित्ररथ असून यावेळी जिल्हयातील लोकप्रतिनिधी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी गांधी मैदानावरुन जिल्हा परिषद मैदान येथे होणार आहे. ग्रंथमहोत्सवाचे उदघाटन सकाळी 11.30 वाजता होणार असून यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गुल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 वाजता दीपस्तंभ फाऊंडेशनचे प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांचे यशाकडे वाटचाल हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता बंडा जोशी यांची तुफान विनोदी एकपात्री हास्यपंचमी हा कार्यक्रम होणार असून यात झक्कास विनोद, फर्मास किस्से, विनोदी कविता, अफलातून नाटय आणि प्रहसनांचा पंचरंगी कार्यक्रमाचा समावेश आहे.
 ग्रंथमहोत्सवाच्या दुस-या दिवशी शनिवार 14 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होणार यात विविध भागातील कवी सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजता सामाजिक आंदोलने आणि साहित्यातील प्रतिबिंब हा परिसंवाद होणार असून यात नामवंत वक्ते सहभागी होणार आहेत. रविवार 15 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता विद्याथर्यांचा आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता लोकरंगचा लोकबहार कार्यक्रम होणार असून भारूडाचार्य डॉ. रामचंद्र देखणे आमि सहकारी कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी 7 वाजता स्वरनिनाद प्रस्तुत मधुर स्वरांगण हा कार्यक्रम प्रा. सुरेश शुक्ल आणि सहकारी कलावंत सादर करणार आहेत. सोमवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता इथे घडतात वाचक वक्ते हा कार्यक्रम होणार असून यात विविध वाचक, वक्ते सहभागी होणार आहेत. सकाळी 11.30 वाजता कथाकथन होणार असून यात विविध कथाकथनकार सहभाही होणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत ग्रंथमहोत्सवाचा समारोप होणार आहे.
यावेळी राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, उपाध्यक्ष रवि साळुंखे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता हिंदी- मराठी गीतांचा गीतबहार कार्यक्रम होणार असून यात नामवंत कलाकर सहभागी होणार आहेत. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांचे निधन झाले. त्यामुळे ग्रंथमहोत्सव होणार्‍या परिसराला साहित्यकार डॉ. आनंद यादव नगरी नाव देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दोन प्रवेशव्दार असणार असून त्यांना प्रा. द.भि.कुलकर्णी, डॉ. ढेरे या साहित्यिकांची नावे देण्यात येणार आहेत. ग्रंथमहोत्सवात 120 स्टॉल असून कॅशलेस ग्रंथविक्रीही होणार आहे. या ग्रंथमहोत्सवास दरवर्षीप्रमाणे सातारा जिल्हा वासियांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहनही जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्या सदस्यांनी यावेळी केले.