महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संतांच्या विचारात :- डॉ. श्रीपाल सबनीस ; पुस्तक प्रकाशन, गुंफण पुरस्कार सोहळा संपन्न

सातारा :  महाराष्ट्रात काही लोकांकडून जातीय भिंती उभ्या करून समाजामध्ये  फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संत परंपरेतील विचारात असून ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
सातारा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात गुंफण अकादमी व यशवंतराव चव्हाण विचार मंचतर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन व गुंफण गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. सबनीस अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम, मसूरच्या सरपंच सुनीता मसूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य रमणलाल शहा लिखित आम्ही जिंकिला संसार व डॉ. बसवेश्‍वर चेणगे लिखित प्रश्‍नवेध या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य शहा यांचा 85 व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, संगम उद्योग समूहाचे बाळासाहेब कुलकर्णी, राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख सिध्देश्‍वर पुस्तके, सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबिरे, वास्तुशास्त्र अभ्यासक नेहा शहा व गेवराई (जि. बीड) येथील प्रसिध्द वक्ते रामानंद तपासे यांना गुंफण गुणगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे बनून प्रत्येक विरोधकाचे मन जिंकले पाहिजे, तर काँग्रेस कार्यकर्त्याने हिमालयाच्या रक्षणासाठी धावून जाणार्‍या सह्याद्रीसारखे म्हणजेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे बनले पाहिजे, असे मत डॉ. सबनीस यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना व्यक्त केले. गुंफण अकादमीचे पुरस्कार ही मराठी संस्कृतीची सुंदर गुंफण आहे. अकादमीने पुरस्कारासाठी कोणत्याही एका जाती धर्मातील व्यक्तीला न निवडता संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब दिसेल अशा सर्व समाजातील व्यक्तींची निवड केली हे महत्त्वपूर्ण आहे. त्याद्वारे अकादमीने समाजातील सर्व जातीधर्मांचा गुणगौरव करून सांस्कृतिक बेरीज साधली आहे. डॉ. चेणगे प्राचार्य रमणलाल शहा  यांच्याबद्दल गुरूवर्य असा आदराने उल्लेख करतात तर प्राचार्य शहा डॉ. चेणगे माझे मित्र असा उल्लेख करतात यातच या सोहळ्याचे मोठेपण पहावयास मिळते, असे उद्गार त्यांनी काढले.
आजच्या व्हॉटस् अ‍ॅपच्या जमान्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास झालेली      अलोट गर्दी आश्‍चर्यचकित करणारी असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी प्राचार्य शहा व डॉ. चेणगे यांच्या साहित्यकृतींचे कौतुक केले. प्राचार्य शहा यांचा अभ्यास, व्यासंग व त्यांनी संत साहित्यावर केलेले चिंतन उल्लेखनीय आहे. समाजासाठी त्यांचे साहित्य मार्गदर्शक व प्रेरक आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी मिलिंद जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, सीए दिलीप गुरव, नेहा शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत कांबिरे यांचा यावेळी न्यायालय अधीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल    मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
85 वाढदिवसानिमित्त प्राचार्य शहा व गुंफण पुरस्कार विजेत्यांचा कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, डॉ. सुभाषराव एरम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने संचालक प्रकाश बडेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्‍वर चेणगे यांनी केले. यशवंतराव चव्हाण विचार मंचचे नितीन शहा यांनी स्वागत, तर चंद्रकांत कांबिरे यांनी सूत्रसंचालन केले.
सुजीत शेख यांनी आभार मानले. प्रारंभी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना सभागृहाच्यावतीने दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.