महाबळेश्‍वरमध्ये मुसळधार; पाच इंच पावसाची नोंद

 

महाबळेश्‍वर : परतीच्या पावसाचा जोर वाढला असून येथे कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोर पकडल्यामुळे शहर व परिसरातील जनजीवन प्रभावित झाले आहे. आज सकाळी साडेआठ पयर्ंतच्या चोवीस तासात येथे तब्बल 237 मीमी पावसाची नोंद झाली आहे. जर आज अखेर येथे 6008 मीमी पाऊस झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे वेण्णा धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी महाबळेश्‍वर पांचगणी रस्त्यावर आल्याने या रस्त्यावरील वाहतुक मंद झाली आहे. तसेच या भागातून वहात असलेल्या वेण्णा नदी दुथडी भरून वाहत असून पात्रातून बाहेर आलेले पाणी परिसरातील शेतीमध्ये घुसले आहे. त्यामुळे हा सर्व परिसर जलमय झालेला दिसत आहे. आज सकाळी साडेआठ पासून मुसळधार पावसाची संततधार असून नऊ तासात येथे तब्बल 126 मीमी म्हणजेच पाच इंच पावसाची नोंद झाली आहे. विकंेंड असल्याने पर्यटकांची आवक चांगलीच वाढली आहे. या सर्व पर्यटकांना मुसळधार पावसामुळे कोणत्याही पाँइर्ंटवर जाता आले नाही. तसेच वेण्णालेक येथील पालिकेचा बोट क्लब सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ बंद ठेवण्यात आला होता. महाबळेश्‍वर आगारातून सुटणारे बसेस ही उशीरा धावत होत्या.

 

पावसाने विश्रांती घेतल्याने लिंगमळा परिसरात पेरण्या करण्यात आल्या होत्या. जर असाच पाऊस सुरू राहिला तर बळीराजा समोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. ग्लॉनोगल डॅम मधुन सुरू असलेल्या गळतीमुळे धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली चालली होती. परंतु गेली दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या धरणातील पाण्याची पातळी वाढली वाढली आहे. या धरणाच्या सांडव्या वरूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. हौशी पर्यटक या मुसळधार पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. बस स्थानक, वेण्णालेक, छ. शिवाजी महाराज चौक येथील चहाच्या टपरीवर गरमागरम चहा पिण्यासाठी तसेच गरमा गरम मक्याचे कणीस खाण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. महाबळेश्‍वरकडे येणारे सर्वच घाटात जागोजागी धबधबे दिसू लागले आहेत. अंबेनळी घाटात मोठ्या धबधब्यावर हौशी तरूणाईची गर्दी झाली होती.