विक्रमबाबा पाटणकर यांच्या प्रयत्नातून डोंगर-दुर्गम वनकुसवडे पठारावर महाआरोग्य शिबिर संपन्न.

पाटण:- नेहमीच आरोग्य सुविधेपासून वंचित राहिलेल्या डोंगर – दुर्गम वन कुसवडे पठारावर विक्रमबाबा पाटणकर यांच्या प्रयत्नातून पुणे येथील २५ तज्ञ डॉक्टरांचा सहभागाने वनकुसवडे डोंगर पठारावरील गोरगरीब नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात डोंगर पठारावरील महिलांचे आजार, बालरोग, त्वचारोग, नेत्र तपासणी, हदय रोग हिमोग्लोबिन तपासणी, रक्त तपासणी, हृदय विकार, पोटाचे विकार, सांधेदुखी, मूत्राशयाचे आजार अशा अनेक विविध आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य शिबिराचा डोंगर परिसरातील गावातील लोकांनी लाभ घेतला.
राजर्षी समाज प्रबोधन व विकास संस्था पाटण आणि सहयोग फाउंडेशन भोसरी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने काटी ता. पाटण येथे सर्वरोग निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर म्हणाले या डोंगरपठारावर कुठेही आरोग्य केंद्र नाही आरोग्य सोयी उपलब्ध नाहीत सातवी नंतर या ठिकाणी शिक्षणाची सोय नव्हती तालुक्यामध्ये नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत तालुक्यामध्ये २५ किलोमीटर पर्यंत एकही हायस्कूल नाही त्यामुळे येथील मुलांची शिक्षणाची फार मोठी गैरसोय होती येथील डोंगर पठारावरील नागरिकांना आरोग्य सुविधा पासून वंचित राहावे लागत होते या ठिकाणी आम्ही राजर्षी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हायस्कूल सुरू केले आहे. दुर्गम भागातील या हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागत आहे. या हायस्कूलमध्ये येणारे विद्यार्थी हे या दुर्गम डोंगर पठारावरील आहेत. गोरगरीब जनतेच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. त्यांना वेळच्यावेळी आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत अशा दुर्गम भागांमध्ये आरोग्य शिबिरे राबवण्याची खूप गरज आहे. आजचे आरोग्य शिबिर या डोंगरावरील जनतेला लाभदायक ठरेल.असे विक्रमबाबा पाटणकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
यावेळी सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ अमोल कामटे डॉ नेमिनाथ खोत, पिंपरी चिंचवड मनपा चे नगरसेवक डॉ. संजय आहेर, भाजपा पाटण तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, डॉ. विजय साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ अमोल कामटे म्हणाले सहयोग फाऊंडेशन ही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या माध्यमातून तयार झालेली आहे. समाजासाठी काहीतरी विधायक काम करावे यासाठी या संस्थेची निर्मिती केली आहे. दुर्गम भागात नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी ही संस्था काम करत आहे. या डोंगरपठारावर महाआरोग्य शिबिराचे केलेल्या आयोजनामुळे येथील जनतेला निश्चितच फायदा होईल असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ नेमिनाथ खोत यांनी सुद्धा ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या व आरोग्य शिबिराचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबिरात सहयोग फाउंडेशनचे डॉ.संतोष भांडवलकर, डॉ. सचिन बोराटे, डॉ प्रवीण कांबळे, डॉ. सी बी पवार, डॉ. संजय लोखंडे, डॉ. प्रशांत बोराडे,डाॅ जगदीश पाटील यांचे सह सर्व डॉक्टर्सनी परिश्रम घेतले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमास ज्ञानदेव गावडे, शिरीष देशमुख सुभाष शिर्के व पद्मावती हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक वर्ग यांचे सह डोंगर पठारावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.