परळी खोर्‍यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न केल्यास धरणाचे पाणी सोडणार : आ. शिवेंद्रसिंहराजेंचा इशारा ; दि. 22 रोजी उरमोडी धरणस्थळी आंदोलन

सातारा : उरमोडी धरणासाठी परळी खोर्‍यातील वेणेखोल, दहिवड, आरगडवाडी, लुमणेखोल, सायळी, रोहोट, वडगाव, पाटेघर, परळी, आंबवडे, निगुडमाळ आदी गावातील जमिनी गेल्या आहेत. परळी खोर्‍यातील या सर्व प्रगल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्‍न रखडलेला आहे. हा प्रश्‍न त्वरीत न सोडवल्यास 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उरमोडी धरणाचे पाणी सोडून देवू, अशा गर्भित इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. दि. 22 जानेवारी रोजी परळी खोर्‍यातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचे नेतृत्व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले करणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
परळी खोर्‍यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत नोकरी न देता त्यांना प्रत्येकी एकरकमी 25 लाख रुपये रक्कम देण्यात यावी. 19 वर्ष पुनर्वसनापासून वंचित असल्याने या प्रकल्पग्रस्तांचे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पतन झाले असून बहुतांश सर्वच प्रकल्पग्रस्त कर्जबाजारी झाले आहेत. तसेच 40 टक्के मुळ खातेदार मयत झाले असून त्यांच्या अपेक्षाही अपुर्ण राहिल्या आहेत. याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. मयत खातेदारांना 1 एकर जमीन अतिरिक्त देण्यात यावी. वेणेखोल गावाचे पुनर्वसन म्हसवड ता. माण येथे होणार होते मात्र मुळ नियोजनात बदल करुन सुध्दा संबंधीत अधिकारी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करु इच्छित नाहीत. वेणेखोल येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड येथेच करावे. पळशी ता. माण येथे वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे बोगस पुनर्वसन दाखवून ग्रामपंचायत ठरावाविना तेथे नागरी सुविधांवर 1 कोटी 23 लाख रुपये खर्च केला आहे. याप्रकरणी संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करुन शासनाचे झालेले नुकसान वसुल करण्यात यावे आदी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत.
पुनर्वसनाचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावावा अन्यथा दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उरमोडी धरणाच्या भिंतीवर परळी खोर्‍यातील सर्व प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व आ. शिवेंद्रसिंहराजे करणार असून मागण्यांबाबत शासनाकडून चालढकल झाल्यास धरणाचे पाणी सोडून देण्याचा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे.