करंजेतील अनधिकृत बेकरी पालिकेकडून सील

सातारा : विनापरवाना बांधकाम करुन मुजोरी करणार्‍या करंजे येथील बाबर कॉलनीतील बेकरीवाल्याला पालिकेने शुक्रवारी जोरदार दणका दिला. वारंवार नोटिसा बजावूनही दखल न घेतल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टातून आदेश मिळवत पालिकेने त्याची बेकरी असलेल्या इमारतीला सील ठोकले.
सातारा पालिकेला जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिलेल्या आदेशानुसार मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पालिकेच्या शहरविकास विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
323 बाबर कॉलनीत इस्माईल अबुलाल तायकांदी यांनी बांधकाम केल्याचे आणि त्यामध्ये व्यवसाय सुरु केला होता. याची पालिकेकडे आणि जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारीही झाल्या होत्या. 2013 पासून या तक्रारी होत्या. पालिकेने शर्थभंगाची नोटीस देऊनही  संबंधितांनी अटीशर्थीची पूर्तता केलेली नव्हती. याप्रकरणी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पालिकेला आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेने दि. 4 रोजी इस्माईल यांना नोटीस बजावली. तरीही त्यांच्याकून कोणतीही कार्यवाही न झाल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या सल्ल्याने सील करण्याची कारवाई करण्यात आली.
 शहर विकास विभागाचे शैलेश आष्टेकर, प्रकाश शिर्के, अशोक गवळी, सतीश साखरे, गोविंद मोहिते यांनी करंजे येथे जावून सदरील कारवाई केली.