दै. ग्रामोध्दार वृत्ताची दखल : बाँम्बे रेस्टॉरंट चौकातील गणपती विक्रेत्यांचे स्टॉल हटवले

बांधकाम विभागाची कारवाई
सातारा : सातारा-कोरेगाव रोडवरील बाँम्बे रेस्टॉरंट चौक ते कृष्णानगर दरम्यान, गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणपती स्टॉल रस्त्याच्याकडेला अतिक्रमण करुन बेकायदेशीर लावण्यात आली आहेत. याबाबत दै. ग्रामोध्दारने सलग दोन दिवस पाठपुरावा करुन वृत्त दिले होते. या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने दखल घेवून अतिक्रमण केलेल्या गणपती स्टॉल धारकांना नोटीसा बजावून स्टॉल स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेवून सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा या कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी अतिक्रमण केलेले चार ते पाच शेड हटविण्यात आले आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग सातारा या कार्यालयाचे उपअभियंता पी. एस. मोहिते व शाखा अभियंता आर. के. जाधव यांनी दिली आहे.
गणपती स्टॉल धारकांकडून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, भिस्तीची गरज असे सर्व प्रथम दै. ग्रामोध्दारने दि. 22 ऑगस्ट 2016 रोजी सचित्र वृत्त प्रसिध्द करुन वाचा फोडली आहे. सातारा-पंढरपूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. बाँम्बे रेस्टॉरंट चौक ते कृष्णानगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बाजूला मोठ्या प्रमाणात फिरस्ते व्यवसाविक गाडे व शेड उभे करुन अतिक्रमण करीत होते, जिल्हा प्रशासनाने दखल घेवून दोन वर्षापूर्वी अतिक्रमणे काढली होती. याच ठिकाणी गणपती स्टॉल लावण्यास जिल्हा प्रशासनामार्फत निर्बंध घातले असताना उपनगरातील काहींनी खाजगी कमिटी स्थापन करुन गणपती स्टॉल उभे करण्यास भाग पाडले आहे अशी चर्चाही सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने गणपती स्टॉल उभे करण्यास जिल्हा परिषद मैदान व बाँम्बे रेस्टॉरंट चौक उड्डाणपूलाच्या खाली या ठिकाणी सुरक्षित गणपती स्टॉल उभे करण्यास दोनच वर्षापूर्वी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचा जीवही धोक्यात घालण्याचा प्रयत्न सध्या गणपती स्टॉल धारकांकडून सुरु होता. याबाबत गांभीर्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दै. ग्रामोध्दारच्या वृत्ताची दखल घेवून सोमवारी रात्रीपासूनच गणपती स्टॉल स्थलांतर करण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता आर. के. जाधव यांनी दूरध्वनीवरुन दिली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने गणेश स्टॉलचे स्थलांतर आवश्यक
सातारा-कोरेगाव रोडवरील बाँम्बे रेस्टॉरंट चौक ते कृष्णानगर दरम्यान, रस्त्याच्याकडेची अतिक्रमण करुन उभे केलेले स्टॉल तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने स्थलांतरीत करण्याच्या सूचना आपण बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनास तातडीने देणार आहे. प्रशासनाने दिलेल्या जागेवरच गणपती स्टॉल लावावेत.
अश्‍विन मुद्गल
जिल्हाधिकारी, सातारा.