एसटीने भोंगळ कारभार त्वरीत सुधारावा : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा : सातारा तालुक्यात प्रामुख्याने परळी खोरे, कास पठार, शेंद्रे या परिसरातील गावांमध्ये जाणार्‍या एस.टी. बसेस अचानक रद्द करणे. रस्त्यात अर्ध्या वाटेत एसटी बसेस बंद पडणे यासह वेळेवर गाड्या न सोडणे यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या संबंधीत अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सुरु असलेला भोंगळ कारभार त्वरीत सुधारावा अन्यथा आमच्या पध्दतीने सुधारणा करु, असा सज्जड इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
एस.टी. महामंडळाच्या भोंगळ कारभार थांबवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विभाग नियंत्रक सौ. अमृता ताम्हणकर यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, आगार व्यवस्थापक गणेश कोळी, वाहतूक नियंत्रक विजय मोरे, विद्या पवार, परळीचे उपसरपंच आनंदा गायकवाड, सुनील वाईकर, यशवंत गंगावणे, अजय काशीद, राहिदास भंडारे, विजय गुजर, दीपक देवरे, शिवाजी सावंत यांच्यासह परळी, कास, ठोसेघर, शेंद्रे, बामणोली आदी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा आगाराच्या मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दररोज या भागातून सातारा व अन्यत्र प्रवासी ये- जा करत असतात. असे असताना या भागातील गाड्या बंद करुन सहलीला सोडल्या जातात. परळी, केळवली, आरे-दरे, जांभे, आसनगाव, तेटली, कास, बामणोली, चिखली, लावंघर, आलवडी आदी भागातील नियमीतच्या गाड्या अचानक रद्द केल्या जातात. तसेच या डोंगराळ भागात जुन्या आणि खिळखिळ्या झालेल्या गाड्या पाठवल्या जातात. त्या बोगद्याच्या बाहेर गेल्या की, कुठेतरी मध्यावरच बंद पडतात. दुरुस्त होईपर्यंत पुर्ण दिवस जातो यामुळे प्रवासी आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे नुकसान आणि हाल होत आहेत. महामंडळाला याबाबत वारंवार समजावले तरीही कारभारात सुधारणा होत नाही.
एस.टी. महामंडळाने मनमानी कारभार त्वरीत थांबवावा. कारभारात सुधारणा करुन प्रवाशांना  दर्जेदार आणि आपुलकीची सेवा द्यावी. अन्यथा आम्हाला कडक भुमिका घ्यावी लागेल, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिला. यावर कारभारात त्वरीत सुधारणा करु, असे ताम्हणकर म्हणाल्या.