धोम-बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वाच्या अंतीम टप्प्यात 

फलटणः फलटण, खंडाळा तालुक्यातील कायम दुष्काळी पट्टयाला वरदान ठरलेल्या धोम-बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वाच्या अंतीम टप्प्यात असून कि.मी. क्रमांक 140 मधील सुमारे 95 मीटर लांबीच्या 15 व्या बोगद्याची खुदाई पूर्ण झाली आहे त्यामुळे आता कृष्णेचे पाणी जावली, आदंरुडपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे या प्रकल्पाचे  कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.
18 हजार हेक्टर क्षेत्रास लाभ होणार
कृष्णानदीवर धोम धरणाच्या वरच्या बाजूस 4.08 टीएमसी क्षमतेचे हे धरण उभारण्यात आले असून त्याला उजवा व डावा असे दोन कालवे आहेत. पैकी डावा कालव्याद्वारे भोर तालुक्यातील 1050 हेक्टर आणि उजवा कालव्याद्वारे खंडाळा व फलटण तालुक्यातील 17050 हेक्टर क्षेत्रास या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
फलटण तालुक्याचा कायम दुष्काळी पट्टा प्रामुख्याने आदर्की ते आंदरुड या भागातील शेती क्षेत्र या प्रकल्पाच्या पाण्याने बागायती होणार आहे. सध्या मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वाच्या अंतीम टप्प्यात असून गेल्या 4 वर्षापासून या कालव्यातून खंडाळा व फलटण तालुक्यातील शेती क्षेत्राला कृष्णेचे पाणी उपलब्ध होत असल्याने प्रामुख्याने लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या तसेच चार्‍यासाठी पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागला आहे.
पाणी टंचाई संपुष्टात येवुन बागायत क्षेत्रात वाढ
सदरचे पाणी कालव्यालगतच्या पाझर तलाव, ग्रामतलाव व तत्सम बंधारे भरुन घेण्यासाठी वापरण्यात आल्याने त्या लगतच्या विहिरींना मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पाझराचा लाभ झाल्याने आज या कायम दुष्काळी पट्टयात बागायत सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून पोट कालव्याची कामे झाल्यानंतर आगामी 2 वर्षात हा कायम दुष्काळी पट्टा बागायती क्षेत्रात समाविष्ट होणार आहे. गेल्या 4 वर्षात प्रामुख्याने पावसाळ्यात नदीवाटे वाहून जाणारे पाणी या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रात सोडल्याने या भागातील प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न पहिल्या टप्प्यात सुटला आणि त्यानंतर आता टप्प्या टप्प्याने शेतीला पाणी उपलब्ध होत असल्याने या भागातील शेतकरी सुखावला आहे.
95 मीटर लांबीच्या बोगद्याची खुदाई पूर्ण
दरम्यान 147 कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्याचे अंतीम टप्यातील 140 कि.मी. मधील 15 व्या बोगद्याचे काम एप्रिल 2017 मध्ये सुरु झाले आज (दि. 17) रोजी सदरचे काम पूर्ण झाल्याने आता या प्रकल्पाचे पाणी जावलीपर्यंत पोहोचणार असून जावली आंदरुडपर्यंत पाणी जाण्यातील मोठे काम पूर्ण झाल्याने उर्वरित कामे पूर्ण करुन घेवून प्रकल्पाचे पाणी आंदरुडपर्यंत लवकर पोहोचेल असा विश्‍वास व्यक्त होत आहे.
आगामी सप्ताहात या प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात येणार असल्याने आदर्कीपासून टप्पा टप्याने दुधेबावी, पोकळेवाडा, मिरढे, जावलीपर्यंत पोहोचेल याची ग्वाही या प्रकल्पाचे उप अभियंता घोगरे यांनी दिली आहे.
प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचा त्याग मोठा
कृष्णा खोर्‍यातील सर्वच प्रकल्पासाठी आपल्या परंपरागत जमिनी, घरे, दारे सोडून लाभक्षेत्रात दाखल झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा त्याग या प्रकल्पा पाठीमागे खंबीरपणे आहे त्याचबरोबर लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी येणार असल्याने स्वत:च्या जमिनी स्वखुशीने पुर्नवसनासाठी उपलब्ध करुन दिल्या त्यांचाही त्याग निश्‍चितच मोठा आहे.
त्यानंतर आता मुख्य कालव्याचे काम सुरु झाल्यानंतर त्यासाठी कालवा क्षेत्रातील शेतकर्‍यांनी स्वत:च्या जमिनी उपलब्ध करुन देवून दाखविलेली त्यागाची भावना निश्‍चितच प्रेरणादायी असून या सर्वांच्या त्यागातूनच कायम दुष्काळी पट्टा बागायती होत आहे. पाणी येण्यास विलंब होत असल्याने नाराजी निश्‍चित आहे परंतू आता पाणी पोहोचल्याने समाधान निर्माण झाले आहे. नीरा-देवघरचे कालवेही अशाच पध्दतीने तातडीने पूर्ण करुन घेण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांकडून होत आहे.