जिल्हाधिकार्‍यांच्या निषेधार्थ लक्ष्मण मानेंचे मुंडण 

सातारा : सामाजिक विविध न्याय हक्क मागण्यांसाठी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाने गेल्या तीन  दिवसांपासुन चक्री उपोषण सुरू केले आहे. पंरतु जिल्हधिका़र्‍यांनी याची कसलीही दखल घेतली नाही. तसेच उपोषणकर्त्यांची भेट ही घेतली नाही त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या निषेधार्थ पदमश्री लक्ष्मण माने व ओबीसी संघटनेचे अध्यक्ष नेताजी गुरव यांनी जिल्हाधिकरी कार्यालयासमोर मुंडण करून निषेध केला.
भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदमश्री लक्ष्मण माने यांनी विविध संघटनांना सोबत घेवून गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. यामध्ये त्यांनी विविध मागण्या केल्या असून त्यामध्ये शासकीय नोकरभरती तात्काळ सुरू करा, सरकारी नोकरांच्या पेन्शन 2005 पासून सर्वांना सुरू करा, भटके विमुक्त धनगर वंजारी व विशेष मागास प्रवर्ग यांचा समावेश अनुसुचित जमातीत करा, कॉन्ट्रक्ट पध्दतीने भरती बंद करा, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी खासगीकरण केलेल्या सर्व उद्योगधंद्यांना सेवा लागू करा, खासगीकरण बंद करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
मात्र दि. 22 पासुन सुरू करण्यात आलेल्या या उपोषणस्थळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱयांनी भेट दिली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांचा वेगळया पध्दतीने निषेध करण्यासाठी लक्ष्मण माने व नेताजी गुरव  यांनी केस मुंडण करून शासनाचा निषेध केला. आता तरी जिल्हाधिका़र्‍यांना जागा येईल का असा संतप्त सवाल लक्ष्मण माने यांनी केला आहे.