ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज चिरमुले पुरस्काराने सन्मानित

सातारा ः कै. अण्णासाहेब चिरमुले यांच्या सारख्या काळाच्यापुढे पाहणार्‍या द्रष्टया पुरूषांची आजही देशाला गरज आहे. सातारसारख्या छोट्या गावात 1920 च्या आसपास आयुर्विम्याचे महत्व ओळखून वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स सारखी कंपनी स्थापन करून ती किर्तीवान करण्याचे त्यांचे काम अतुलनीय आहे. त्यांचेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आता कोणतेही पुरस्कार न स्वीकारण्याच्या माझ्या भूमिकेत मी अपवाद करून मी हा पुरस्कार स्वीकारत आहे असे उद्गार ख्यातनाम उद्योगपती राहुल बजाज यांनी काढले. पुणे येथे एका अनौपचारिक कार्यक्रमात त्यांना 2017 चा चिरमुले पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
कै. जमनालाल बजाज यांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत, त्यांच्यापासून  प्रेरणा घेऊन आणि त्यांचे संस्कार जपत मी  आणि माझी पुढची पिढीही भारताच्या आणि महाराष्ट्राच्याही  औद्योगिक विकासात योगदान देत आहोत. बजाज अ‍ॅटो दुचाकी आणि तिचाकी बनवणारी जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. या प्रगतीचे श्रेय आम्ही जपलेली देशसेवा, सचोटी, प्रांजल आणि स्पष्ट व्यवहार तसेच सर्व कर्मचार्‍यांचे योगदान याला आहे.
आत्ताच अरूण गोडबोले यांनी सातार्‍यातील महाराष्ट्र स्कुटर्स हा कारखाना बजाज ग्रुपने पुढाकार घेऊन पुन्हा चालु करावा अशी आग्रहाची विनंती केली. सातारकर म्हणून त्यांची भावना  योग्य आहे मात्र याबाबत महाराष्ट्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यास त्याचा निश्‍चित विचार करणे शक्य होईल असे मी आश्‍वासन देतो असेही ते पुढे म्हणाले.
आपल्या प्रास्ताविकात चिरमुले ट्रस्टचे माजी विश्‍वस्त  आणि पुरस्कार समितीचे निमंत्रक अरूण गोडबोले यांनी चिरमुले ट्रस्ट हा युनायटेड वेस्टर्न बँकेने आपल्या संस्थापकांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन केला असून त्यामार्फत जनतेला अर्थसाक्षर करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात असे नमूद केले. दरवर्षी बँकींग, अर्थशास्त्र, उद्योग अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग काम करणार्‍या व्यक्तिस चिरमुले पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. रूपये एक लाख, सन्मानपत्र, समर्थ रामदास स्वामींची रामनामी शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  यापुर्वी डॉ. मनमोहन सिंग, रतन टाटा, डॉ. नारायण मूर्ती, अरूण शौरी, डॉ.सी. रंगराजन, डॉ. अनिल काकोडकर आदि मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राहुल बजाज यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अतिशय अनौपचारिक व मनमोकळया वातावरणात झालेल्या कार्यक्रमात बजाज यांनी विविध विषयांवर आपली परखड मते व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी चिरमुले ट्रस्टचे विश्‍वस्त श्रीकांत जोशी, डॉ. अनिल पाटील, दिलीप पाठक, डॉ. अच्युत गोडबोले आणि समीर जोशी तसेच बजाज अ‍ॅटोमधील अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
(छाया ः राहुल देशपांडे, सातारा)