जलयुक्त शिवार अभियानामुळे दुष्काळाचा कलंक मिटणार ; दोन वर्षात माण तालुक्यात 70 गावे टंचाईमुक्त, यावर्षी 36 गावांचा सहभाग

सातारा : राज्यात शिवसेना भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील दुष्काळी तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागावा तसेच शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारावे या उदात्त हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान महसूल व कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजना सुरु केली. या योजनेमुळे खर्‍या अर्थाने दुष्काळी तालुक्यातील कलंक मिटवण्यास सुरुवात झाली आहे. याची प्रचिती सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा या तालुक्यात पहायला मिळू लागली आहे. गेल्या दोन वर्षात जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या माण तालुक्यातील 70 गावे टंचाईमुक्त झाली आहेत. सन 2017-18 अंतर्गत माण तालुक्यातील 36 गावांची निवड करण्यात आली आहे.
माण तालुक्यातील निवड झालेल्या 36 गावामधील अस्तित्वात, मंजूर कामे 350 554.48 लाखाचा निधी प्रस्थावित आहे. नव्याने हाती घ्यावयाची कामे 400 असून 2536 हेक्टर क्षेत्रावर नालाबांध, सिमेंट बंधारेसाठी 3725.72 लाखाचा निधी प्रस्तावित आहे. अस्तित्वातील जलस्त्रोतांची दुरुस्ती व बळकटीकरण करणे, गाळ काढणे, 138 कामासाठी 1627.55 लाखाचा निधी प्रस्तावित आहे. या प्रमाणे 888 कामे 2536 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असून त्यासाठी 597.75 लाखाचा निधीचा आराखडा निश्‍चित केला आहे. सन 2017-18 मध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी माण तालुक्यातील मंजूर झालेली गावे डंगिरेवाडी, राणंद, लोधवडे, जाधववाडी, घेरेवाडी, हस्तनपूर, ढाकणी, डंगिरेवाडी (मोही), कुरणेवाडी, महाबळेश्‍वरवाडी, बनगरवाडी, शेनवडी, जांभुळणी, गंगोती, पुळकोटी, देवापूर, पळसावडे, चिलारवाडी, वडजल, राहेवाडी, खंड्याचीवाडी, खोडके, गाडेवाडी, शिंदी बुदू्रक, माळवाडी, आगासवाडी, कासारवाडी, काळेवाडी, बोथे, बिदाल, बोडके अशी एकूण 36 गावाची निवड झाली आहे. पहिल्यावर्षी 24 गावे, दुसर्‍यावर्षी 46 गावे तर यावर्षी 36 गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश केला आहे.
टंचाईमधील गावांना दरवर्षी जानेवारी, फेबु्रवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असे एकूण 6 महिने टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. दरवर्षी टंचाईचा आराखडा तयार करुन शासनाचे लाखो रुपये पाणी पुरवण्यासाठी खर्च केले होते, यामध्ये बदल व्हावा, म्हणून लोकांचा सहभाग वाढवून तसेच सामाजिक संघटना याना बरोबर घेवून महसूल, कृषि व इतर विभागाने हातात हात घालून दुष्काळाचा कलंक मिटविण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न खरोखर वाखणण्याजोगा आहे. तहसिलदार, प्रांत अधिकारी, जिल्हा कृषि अधिक्षक, कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, समन्वयक, पत्रकार यांच्या रेट्यामुळे चुटकीसरशी अनेक गावाची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु झाली आहे. आता जलयुक्त शिवार अभियानाला खर्‍या अर्थाने चांगले यश मिळाले आहे, हे निश्‍चित.