नटराज मंदिरात जन्माष्टमी निमित्त बहारदार भरतनाट्यम

सातारा : येथील उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी औचित्य साधून नुकताच भरतनाट्यम नृत्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. श्री नटराज नृत्य कला शाळेच्या गुरु सौ. आचल शानभाग घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम नृत्याचे प्रशिक्षण घेणार्‍या कलाकारांनी हा नृत्य प्रकार सादर केला. यामध्ये स्वत: गुरु सौ. आचल घोरपडे यांच्या समवेत नटराज कला शालेच्या राधा काटदरे, सिध्दी भुरके, कायत्री जयदेवकर, श्रावणी कासार यांनी विविध दहा नृत्य प्रकार सादर केले.
पुष्पांजलीने या नृत्य सोहळ्याची सुरुवात होवून त्यानंतर श्रीकृष्ण तृस्ती श्री गणेश कौतुकम, नृत्य देवता श्री नटराज कौतुकम, श्रीकृष्ण शब्दम, कानाडी रचना…कृष्णानी बेगणेबारो…त्यानंतर संत पुरंदर दासांची कानाडी रचना आणि तिल्लाना सादर होवून या नृत्य सोहळ्याची सांगता झाली.
श्री गणेशोत्सवानिमित्त येत्या 13 सप्टेंबरला गणपती देवावर आधारीत रचनांचे भरतनाट्यम सादर केले जाणार आहे अशी माहिती आचल घोरपडे यांनी दिली. जन्माष्टमीच्या विविध नृत्यांना दाद देण्यासाठी नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त रमेश शानभाग, रनजीत सावंत, मार्गदर्शिका सौ. उषा शानभाग, संकेत शानभाग, व्यवस्थापक चंद्रन तसेच नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.