जिंती येथे जलयुक्त शिवार अभियान लोकार्पण सोहळा उत्साहात

कराड: जलसंधारणासाठी नवीन बंधारे बांधणी व जुन्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱयांची दुरुस्ती करण्यात आल्या. राज्यात काँग्रेसच्या सरकारने दुष्काळी तालूक्यात साखळी बंधाऱयांची मोहीम राबवली. त्यातून ओढ्यांवर एका खालोखाल एक असे साखळी बंधारे बांधल्याने विहीरी व भूगर्भातील जलसंचय वाढण्यास मदत झाली. पण पाऊस चांगला पडला तर त्यामध्ये जलसंचय शक्य आहे.
लांबणारा मान्सून व घटणाऱया पाऊसमानाची सर्वांना चिंता आहे. त्याकरिता वनराई वाढविण्याची जबाबदारी सर्वांवर आली आहे. हवामानामध्ये कार्बनचे प्रमाण वाढल्याने हवामानाचे चक्रही बदलले आहे. या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी पाणी वाचवणे व वनश्री वाढीबरोबर पर्यावरण संतुलनासाठी चतुश्रीची मोहीम राबवली पाहिजे. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
जिंती (ता. कराड) येथे जलयुक्त शिवार अभियान लोकार्पण सोहळा व जिंती ते पाचुंब्री या ग्रामीण मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. माथाडी नेते पोपटशेठ पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. काकडे, आर. जे. पाटील, प्रभारी सरपंच अशोक पाटील, झाकीर पठाण, तानाजी चवरे, उदय पाटील-उंडाळकर, बापूराव काटेकर, नानासाहेब साळुंखे, मंडल कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, कृषी सहायय्क श्री. साळुंखे, बाबा तोरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. चव्हाण म्हणाले, जिंती येथील डोंगरामध्ये 41 किलोमीटर सलग समतल चर काढल्या आहेत. त्यातून संपूर्ण शिवार पाणीमग्न होणार आहे. गावाच्या चौहोबाजूच्या डोंगरातील जलसंधारण व बियारोपणच्या यशस्वी मोहीमेमुळे हे डोंगरी भागातील गाव पुढील काळात हिरवाईने नटेल, याची खात्री आहे.
समाजातील दानशूर व स्वयंसेवी संस्थांनी जलसंधारणाच्या बळकटीसाठी आणखी प्रयत्न केल्यास वनश्री खुलण्याबरोबर हिरवाई वाढेल. सहाजिकच पर्जन्यमान वाढण्यास मदत होईल. ते म्हणाले, जिंती ते पाचुंब्री मार्गाच्या निर्मितीतून दोन तालुके व दोन जिल्हे जोडण्यास वाव मिळेल. पाचुंब्री हद्दीपर्यंत रस्ता नेण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.
गेल्या साडेचार वर्षातील नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची कामे पाहता ते सत्तेतून जायची वेळ आली आहे. शहरी संस्कृतीत वावरणारी मंडळी सत्तेत असल्याने त्यांचे शहरांमधील सुविद्या वाढविण्याच्या नादामध्ये शेतकऱयांवर जाणूनबुजून दुर्लक्ष आहे. कृषीमालाचे भाव दाबून ठेवल्यामुळे शेतीमध्ये बिकट परिस्थिती आहे. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असल्याने सरकारची घाबरगुंडी उडाल्याने त्यांनी शेतकऱयांना रोख पैसे द्यायचे व त्यातून शेतकरी तात्पुरते खुश करण्याची त्यांची भूमिका आहे. नरेंद्र मोदींच्या कारभारात दरवर्षी सरासरी 3 टक्क्यांनी हमीभाव वाढला. परंतु केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना 19 टक्क्यांनी दरवर्षी हमीभाव वाढला. भाजप सरकारच्या काळात शेतमालाला हमीभाव खात्रीशीर नाही. तोच नोटाबंदीमुळे कृत्रिम पध्दतीने शेतकऱयांवर संकट आले आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले. सर्जेराव अंबवडे यांचे भाषण झाले. अशोक पाटील, बबन घागरे, रघुनाथ देसाई, राजाराम चव्हाण, सर्जेराव अंबवडे, दिलीप चव्हाण, दिलीप खोचरे, भगवान खोचरे यांनी स्वागत केले. निवास साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. व जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिंती, चव्हाणमळा, खोचरेवाडी, अकाईवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.