जिल्ह्यात पत्रकारांचे अभूतपूर्व आंदोलन ; सातार्‍यासह 11 तालुक्यात निदर्शने : जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

सातारा : पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी, ज्येष्ठ पत्रकार पेन्शन योजनेची अंमलबजावणी, बातमी लिहिणारा पत्रकार समजून प्रत्येकाला अधिस्वीकृती यासह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे पत्रकार सातार्‍यासह 11 तालुक्यात  सोमवारी रस्त्यावर उतरले. सरकारविरोधात त्यांनी जोरदार निदर्शने केली. संपूर्ण जिल्ह्यात अभूतपूर्व असे पत्रकारांचे आंदोलन झाले.
तालुका पातळीवर तहसीलदार, प्रांतांंमार्फत तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून पत्रकारांनी आपल्या भावना तीव्रतेने मांडल्या.
सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पत्रकारांनी घोषणाबाजी करुन  जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षरश: दणाणून सोडला.  सातारा शहर  व सातारा तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी 11 वाजता एकत्र आलेे. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे, दीपक शिंदे, तुषार भद्रे,   चंद्रसेन जाधव,  एकनाथ थोरात, छायाचित्रकार प्रकाश वायदंडे, संजय कारंडे, प्रविण जाधव,   यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गेली अनेक वर्षांपासून पत्रकांरांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने पत्रकारांनी सरकारचा निषेध केला.  पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून सोडला. त्यानंतर सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.
त्यावेळी हरीष पाटणे म्हणाले,  पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पेन्शनची घोषणा झाली पण अद्याप ती कोणालाही मंजूर झाली नाही. छोट्या वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात धोरणात बदल करून ती  छोटी वृत्तपत्रे बंदच होतील अशा पध्दतीन धोरण आखले जात आहेत. अधिस्वीकृतीच्या अटी जाचक आहेत. याबाबत सातत्याने आंदोलने करुनही सरकार दखल घेत नाही.
त्यामुळे या पुढच्या काळात आणखी तीव्र आंदोलन करावे लागेल.देशात आणि राज्यात विविध मार्गानं पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे केले जाणारे दुर्लक्ष हा त्याचाच भाग आहे.
सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व पत्रकार संघटना एक झाल्या आहेत आणि संपूर्ण राज्यात हे आंदोलन होत आहे, अशी भूमिका विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर,  श्रीकांत कात्रे, तुषार भद्रे यांनी मांडली.
सातार्‍यात झालेल्या आंदोलनात सातारा तालुका पत्रकार संघ, नागठाणे भाग पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार व सातारा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन सहभागी झाले होते.
दरम्यान, सातार्‍याबरोबरच कराड, फलटण, वाई, वडूज, म्हसवड, मेढा, महाबळेश्‍वर, पाटण, खंडाळा, कोरेगाव तालुक्यातील पत्रकार संघटनांनी आंदोलन करुन स्थानिक पातळीवर तहसीलदार व प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले.
पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणीसह विविध मागण्यांबाबत सातारा शहरात काढण्यात आलेल्या पत्रकार मोर्चा प्रसंगी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना  हरीष पाटणे, दिपक प्रभावळकर, विनोद कुलकर्णी, एकनाथ थोरात, श्रीकांत कात्रे  व इतर तर दुसर्‍या छायाचित्रात आंदोलनादरम्यान सहभागी झालेले सातारा जिल्ह्यातील पत्रकार बांधव. (छायाचित्र : प्रकाश वायदंडे)