दि.कराड जनता सहकारी बँकेवर रिझर्व बँकेचे निर्बंध ; कर्ज वितरण, ठेवी काढण्यावर मर्यादा

कराड : दि.कराड जनता सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीचा डोंगर उभा राहीला आहे. त्यामुळे बँकेचा एन.पी.ए.मोठयाप्रमाणावर दिसुन येत आहेत या बँकेच्या प्राप्त परिस्थितीमुळे रिर्झव्ह बँकेने बँक व्यवस्थापनावर निर्बंध घातले आहेत.  जो पर्यंत एन.पी.ए.चे प्रमाण कमी होत नाही तो पर्यंत बँंकेने नवीन कर्ज वितरण करू नये, तसेच ठेवीदारांना 1000पेक्षा जास्त रक्कम देवु नये ही रिझर्व बँकेची अट आहे. दरम्यान सदरच्या माहितीची कुनकुन काही सभासदांना लागली मात्र ही माहिती सर्वत्र वार्‍यासारखी पसरली त्यामुळे जनता बँंकेच्या सभासद, ठेवीदारांत  खळबळ ऊडाली आहे.
कराड जनता बँक ही कराड व तालुक्याची अर्थवाहीनी समजली जाते.  या बँकेत कराड शहराबरोबरच तालुक्यातील अनेक नागरिकांच्या मोठया प्रमाणात ठेवी आहेत राजेश पाटील वाठारकर हे बॅकेचे अध्यक्ष आहेत. सदरच्या बॅकेने आज पर्यंत अनेक कारखाने उद्योग,व्यापारी,व्यवसायिक व इतरांना कर्ज वितरण केले आहे. परंतु बँक व्यवस्थापनाला रिझर्व बँकेचे समाधान होईल असे कामकाज करता आलेले नाही. बॅकेेची अनेक कर्ज प्रकरणे थकबाकीत आहेत. बँकेकडुन म्हणावी तशी वसुली झालेली नाही. हे लेखा परिक्षणात दिसुन आलेले आहे.त्यामुळे रिर्झव बँकेने जनता बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत म्हटले आहे की, बॅकेचे व्यवस्थापन जोपर्यंत एन.पी.ए.चे प्रमाण कमी करत नाही तो पर्यंत बँकेला नवीन पद्धतीचे कोणतेही कर्ज वाटप करता येणार नाही. तसेच ठेवीदारांनाही 1000 पेक्षा जादा रक्कम देता येणार नाही. कर्ज थकीत प्रकरणामुळे बँकेची ही केवीलवाणी परस्थिती निर्माण झाली आहे. सदरची माहिती ठेवीदारांना समजताच ठेवीदांरांत चलबिचल निर्माण झाली आहे. अनेक ठेवीदारांनी जनता बँकेचे मुख्य कार्यालय व शाखामध्ये जावुन बँकेची झालेली वस्तुस्थिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला तेथील व्यवस्थापनाने आलेल्या ठेवीदांरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान आज जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सदर वृत्ताचा खुलासा करताना म्हटले आहे की,  दि कराड जनता सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असून बँकेतील ठेवीदारांची सर्व रक्कम बँकेत पुर्ण सुरक्षित आहे. ठेवीदारांच्या एका पैशालाही धक्का लागणार नाही. बँकेत कसलाही आर्थीक घोटाळा अथवा गैरव्यवहाराचा कोणताही ठपका रिझर्व्ह बँकेने अथवा सरकारी लेखापरिक्षकांनी बँकेवर ठेवलेला नाही. पुर्वीच्या कर्जवसुलीतील असमाधानकारक कामगिरीचा ठपका ठेवीत बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून पुढील काही दिवस नविन कर्जवाटप आणि विशिष्ट कारणांशिवाय ठेवादारांना ठेव रक्कम परत करण्यास निर्बंध आले आहेत. अचानक आलेल्या या संकटावर सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर मात करुन बँक सुस्थितीत आणू. बँकेच्या अस्तित्वाला आणि ठेवीदारांच्या ठेवींना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही, अशी ग्वाही देत या अडचणीच्या काळात सर्वांनी संयमाने व धैर्याने साथ करावी, असे आवाहन बँकेचे चेअरमन राजेश पाटील-वाठारकर यांनी केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
दि कराड जनता सहकारी बँकेने आर्थीकदृष्टया सक्षम असताना पुर्वी काही प्रकल्पांना विशेषतः साखर कारखाना, फिड मिल, दुग्ध व्यवसाय, ऊस तोडणी कंत्राटदार, बांधकाम उद्योगांना कर्जपुरवठा केला होता. या कर्जदारांकडून कर्जाची व्याजासह वेळेत परतफेड करुन घेण्यात बँक अपयशी ठरल्याचा ठपका ठेवीत बँकेला रिझर्व्ह बँकेने पुढील सहा महिन्यात याबाबत आवश्यक पावले उचलण्याचे आदेश देत बँकेच्या दैनंदिन कामकाजात काही निर्बंध आणले असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले, बँकेच्या सन 2015-16 या आर्थीक वर्षाच्या कामकाजाची तपासणी करीत असताना रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली विशेषतः एनपीए बाबत नाराजी व्यक्त केली होती. कराड जनता बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सुचनांवर विशेष लक्ष देवून मे-2017 पर्यंत कर्जवसुली कामकाजात लक्षणीय सुधारणा करुन बँकेची आर्थीक स्थिती मजबुत केली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालताना सदरची सुस्थिती विचारात घेतली नव्हती. बँक ही स्थिती त्यांच्या पुन्हा निदर्शनास आणून देईल, असे सांगत यातून बँक लवकरच बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिझर्व्ह बँकेची 31 मार्च 2016 अखेरच्या सांपत्तीक स्थितीची रेग्युलर तपासणी मे-2017 मध्ये झाली. सदर तपासणीमध्ये बँकेच्या एन.पी.ए.चे प्रमाण जास्त निघाल्याने बँकेवर काही निर्बंध घातले आहेत. यात सामान्य परिस्थीतीत एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. मात्र विशिष्ठ परिस्थितीत हीच मर्यादा आजारपण, शिक्षण, विवाह आदींसाठी एक लाख रुपयांपर्यंची रक्कम काढता येणार आहे. या सर्व परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी बँकेला सहा महिन्यांचा रिव्हायवल कालावधी देण्यात आला आहे. मात्र तत्पुर्वीच आम्ही यातून बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.