जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या साडेचार  एकर जमिनीवर कराड जनता सहकारी बँकेचा ताबा

जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानंतर बँकेची पोलीस बंदोबस्तात कारवाई, लक्ष्मी डिस्टलरीला तात्पुरता दिलासा
कोरेगाव : कराड जनता सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरु केली असून, त्यातून जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना देखील सुटला नाही. गुरुवारी दुपारी प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांच्या आदेशानुसार बँकेने कारखान्याची साडेचार एकर जमीन जप्त करुन ताब्यात घेतली आहे. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे. या जमिनीवर सद्यस्थितीत लक्ष्मी ऑरगेनिक डिस्टलरी असून, तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांना काम करण्यास कोणताही अटकाव करण्यात आलेला नाही. त्यांना तात्पुतर्‍या स्वरुपात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या कारवाईची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड जनता सहकारी बँकेने जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी व वाहतुकीसाठी मोठ्याप्रमाणावर कर्जपुरवठा संचालक व तोडणी वाहतुकदारांच्या नावे केला होता. या कर्जाला कारखान्याने रितसर हमीपत्र दिले होते. तसेच कारखान्याची चिमणगाव येथील गट नंबर 795/1 मधील साडेचार एकर जमीन तारण दिली होती. या कर्जाला मालमत्ताधारक म्हणून कार्यकारी संचालक जामीन होते. कारखान्याचे कर्ज थकल्याने बँकेने वसुलीसाठी तगादा लावला होता. त्यानंतर बँकेने सहकार खाते आणि सहकारी न्यायालयात धाव घेतली होती. 2008 ते 2017 या नऊ वर्षात मिळालेल्या वसुली निवाड्यावर बँकेने कारखान्याची जमीन जप्त केली होती.
जप्त केलेल्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी बँकेने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. महेश कदम, जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्याकडे नोव्हेंबर महिन्यात पत्रव्यवहार केला होता. अपर जिल्हाधिकार्‍यांनी कोरेगावच्या प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांना सदरहू जमीन जप्त करुन बँकेच्या वसुली अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सौ. नलावडे यांनी कुमठे येथील महसूल मंडळ अधिकारी ए. आर. शेख व चिमणगावचे तलाठी व्ही. आर. जाधव यांना लेखी निर्देश दिले होते. बँकेचे वसुली अधिकारी महालिंग आप्पाया शेटेनावर यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बळीराम सांगळे व चार कर्मचारी कारखान्यावर तैनात होते.
मंडळ अधिकारी ए. आर. शेख यांनी महसूल खात्याच्या नियमाप्रमाणे शेटेनवार यांच्याकडे जमिनीचा ताबा दिला. यावेळी बँकेचे चेअरमन राजेश पाटील-वाठारकर, व्हाईस चेअरमन विकास धुमाळ, ज्येष्ठ संचालक डॉ. परेश पाटील-वाठारकर, वसुली अधिकारी केशव पाटील, चेतन पवार, सुनील अनपट, राहूल कडव यांनी जमिनीवर सद्यस्थितीत लक्ष्मी ऑरगेनिक डिस्टलरी असल्याने तेथील प्रवेशद्वारावर आणि सुरक्षा रक्षकांच्या केबीनवर मोठा जाहीर सूचना देणारा फलक लावला असून, त्यात सर्व कायदेशीर माहिती दिली असून, कोणीही उक्त जमिनीचा व्यवहार करु नये, असे स्पष्ट केले आहे.
बँकेने जप्त केलेल्या कारखान्याच्या जमिनीवर जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या स्वमालकीची वर्धनी अवसायनी असून, बांधा, वापरा आणि हस्तांतर करा या तत्वानुसार गोयंका समुहाने उभारलेली आहे. कारखाना आणि गोयंका समुहाच्या करारनाम्यानुसार तेथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी या नावाने डिस्टलरी आहे. सध्या कारखाना आणि डिस्टलरी यांच्यामध्ये वादविवाद असून, ते विविध न्यायालयात सुरु आहेत. बँकेचे वसुली अधिकारी पोलीस बंदोबस्तात महसूल अधिकार्‍यांसमवेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले असता, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या स्थानिक अधिकार्‍यांनी प्रारंभी त्यांना विरोध केला. बँकेने आम्ही जमीन ताब्यात घेणार असल्याचे सांगितले. त्यांना कायदेशीर प्रक्रियेची माहिती देण्यात आली व आवश्यक ती कागदपत्रे दाखविण्यात आली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही स्वरुपाचा अडथळा केला नाही. जमिनीवर असलेल्या डिस्टलरीमध्ये कामकाज करण्यात अडथळा न आणण्याची व तेथे वावर करण्याची मुभा देण्याची विनंती डिस्टलरीच्या अधिकार्‍यांनी केली. ही विनंती लेखी स्वरुपात करा, असे वसुली अधिकार्‍यांनी बजावल्यानंतर लेखी स्वरुपात अर्ज देण्यात आला व त्यास तातडीने मान्यता देण्यात आली. एकंदरीत डिस्टलरीमध्ये वावर करण्यास लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या अधिकार्‍यांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे.