अपुर्‍या पावसाने ऊस, सोयाबीनचे क्षेत्र घटणार

अपुर्‍या पावसाने ऊस, सोयाबीनचे क्षेत्र घटणार
कराड : खरीपाच्या पेरण्या उरकल्या, पण यानंतर पावसाने दडी मारल्याने उर्वरीत पन्नास टक्के पेरण्या रखडल्या आहेत. याचा परिणाम म्हणून यावर्शी ऊसाचे व सोयाबीनचे सरासरी क्षेत्र घटणार असून ज्वारीचे क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू नये यासाठी पाऊस सुरु झाल्याशिवाय पेरणी, टोकणीची कामे सुरु करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. खरीप, रब्बीचे उत्पन्न निम्यापर्यंत घटले आहे. यावर्षी तर पावसाच्या करतरतेने रब्बीची पिके हातची गेली आहेत. दुष्काळाची दाहकता वाढल्याने एप्रिल, मे मध्ये शेतीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. कॅनॉल आटले, विहिरीं खोल गेल्या त्यामुळे शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली. नदीकाठची शेती कृषी तर वाचली पण उत्पन्न मात्र घटले. याचा परिणाम यावर्षीच्या खरीप हंगामावर झाला आहे. पाण्याची उपलब्धता न झाल्याने शेतकर्‍यांची आडसाची ऊसाच्या लागली केल्या नाहीत. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे.
या हंगामात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने मान्सून पूर्व पावसात काही शेतकर्‍यांनी पेरणी, टोकणीची कामे उरकून घेतली. यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने ही कामे ठप्प झाली. कराड तालुक्यात पन्नास टक्के पर्यंत पेरण्या खोळंबल्या आहेत.
शेतकरी दरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जून संपत आला तरी अपेक्षित पाऊस होत नसल्याने शेतकर्‍यांची चिंताही वाढली आहे. पाऊस लांबला तर खरीप पिकांवर याचा परिणाम होणार आहे. दरम्यान कृषी विभागाने पाऊस लागून रहात नाही तो पर्यंत पेरणी, टोकणीची कामे करु नयेत असे आवाहन केले आहे. त्यामुळे सध्यातरी शिवारात खरीपाची लगबग रोडावली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणार्‍या शेतकयांनी बी-बियाणे, खते यांची जमवाजमव मात्र सुरु आहे. पाऊसकाळ नसल्याने ऊस पिकाला बगल देवून षेतकरी सोयाबिन, भुईमुग, भात, खरीप ज्वारी या पिकांना प्राधान्य देताना दिसत आहे. यातही जून मध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबिन पेक्षा ज्वारीला शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे या हंगामात ज्वारीचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात येत आहे.