लोकांचे जीवन सुसह्य करणे कर्तव्य सोशल ग्रुपचे आद्य कर्तव्य

सातारा : गेली 12 वर्ष अविरतपणे समाजसेवेचे व्रत जोपासणार्‍या कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून असंख्य आरोग्य शिबीरे, पर्यावरण रक्षण, प्लास्टीक मुक्ती, स्त्री सबलीकरण आदी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. समाजसेवा हाच कर्तव्य सोशल ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश आणि ध्येय होते. गोर- गरीब आणि गरजू लोकांच्या चेहर्‍यावरील समाधान म्हणजेच ध्येयपुर्ती असून या ध्येयपुर्तीसाठी आणि समाजसेवेसाठी कर्तव्य सोशल ग्रुप अखंडपणे कार्यरत राहील आणि लोकांचे जीवन सुसह्य, आनंदी करण्यासाठी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमीत्त कर्तव्य सोशल ग्रुप आणि सातारा खाटीक समाज यांच्या संयुक्तविद्यमाने भोंदवडे गुरुवार परज शॉपिंग सेंटर येथे आयोजित मोफत मोतीबिदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबिराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी हाजी अमीर पालकर, हाजी मुख्तार पालकर, हाजी मोहम्मद पालकर, हाजी दिलावर पैलवान, हाजी चाँद पालकर, नगरसेवक अल्लाउद्दीन शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या की, कर्तव्यच्या वाटचालीत आरोग्य शिबिर अथवा पर्यावरण रक्षणासाठी घेतलेल्या विविध उपक्रमात नागरिकांचा सहभाग हा खूपच प्रेरणादायी ठरला आहे. मोतीबिंदू शिबीरांमुळे आजपर्यंत हजारो लोकांना नवी दृष्टी मिळाली आहे. जयपूर फूट वाटप उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. कर्तव्यच्या सामाजिक कामामुळे अनेक नवनवीन युवकांच्या ग्रुपना प्रेरणा मिळत असून असे अनेक ग्रुप कर्तव्यच्या कार्यात सक्रीय सहभागी होत आहेत.
समाजसेवा ही कधीही खंडीत न होणारी प्रक्रीया आहे. यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप अविरतपणे कार्यरत राहणार असून समाजसेवा आणि गरजवंतांना मदत करुन त्यांचे जगणे सुसह्य करणे हे कर्तव्य ग्रुपचे आद्य कर्तव्य आहे, असे सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिबीरात 350 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. 200 रुग्णोना चश्मे वाटप करण्यात आले तर, 55 रुग्णांना मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रीयेसाठी पुण्याला पाठवण्यात आले. यावेळी चंदन घोडके, आरीफ शेख, बबन गायकवाड, हानिफ कच्छी, नासीर चौधरी, सुरेश गडकरी, संजय गडकरी, अनवर कलाल, अमिन कच्छी, जावेद सय्यद, इम्तियाज सय्यद, तौफिक पालकर, अबरार पालकर, बबलू सय्यद, आझाद खान, इम्रान खान, असिफ खान, असरार पालकर, सैफ पालकर, इरफान सय्यद, इकबाल शेख, मजहर पालकर, शहिद पालकर, मुस्ताक सय्यद, शहिद सय्यद, इम्रान सय्यद, सुल्तान शेख, वसिम पैलवान, सलमान चौधरी, टिपू कलाल, अस्लम कुरेशी, सैफुद्दीन मोमीन, शकिर भाई, हुसेन पठाण, इरफान शेख, कैश खाटीक, नईम पालकर, रब्बील पालकर आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.