महाखादी यात्रा पोहचली सातार्‍यात खादी हे वस्त्र नव्हे विचार आहे : जिल्हाधिकारी

????????????????????????????????????
सातारा :  खादी एक वस्त्र नसून एक विचार आहे. खादी वस्त्रांचा वापर प्रत्येकाने करुन  त्याचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज केले.
 येथील कन्या शाळेत भरवण्यात आलेल्या महाखादी यात्रा विक्री व प्रदर्शनाचे आज जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, कार्यसन अधिकारी अरुणा दळवी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.
महाखादी यात्रा प्रदर्शन व विक्री महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात भरविण्यात येणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाने आयोजित केलेल्या प्रदर्शन व विक्री स्टॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तु या दर्जेदार आहेत. या वस्तुंचे पॅकींग आकर्षीत करुन एक ब्रँड तयार करावे. या उत्पादनांना प्रशासनामार्फत बाजार पेठ उपलब्ध करुन दिली जाईल. येथे ठेवण्यात आलेल्या खादीच्या वस्त्रांची गुणवत्ता खूप चांगली आहे. पुढच्या वेळेस असे प्रदर्शन हे मोठ्या मैदानावर आयोजित करुन जिल्ह्यातील सर्व उद्योजकांना आमंत्रित करुन असे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी शेवटी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, खादीमध्ये मोठी ताकद आहे. खादीचे वस्त्र वापरणे आता काळाची गरज बनली आहे. स्थानिक उद्योजकांनी आपले उत्पादन अधीक विकसीत करुन स्वत:ची प्रगती साधावी. या महोत्सवामध्ये मंडळाच्या उद्योजकांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉल ठेवण्यात आले आहे. या महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे  आवानही त्यांनी केले आहे.
हे प्रदर्शन कन्याशाळा, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था राजपथ, एल. आय. सी. बिल्डींग जवळ, सातारा येथे  दि. 24 ते 26 ऑक्टोबर 2017 या कालावधीत सकाळी 10 ते सायं. 9 या वेळेत खादी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव कदम यांनी केले तर सर्वांचे आभार दिलीप साळुंखे यांनी मानले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.