खटाव-माण मध्ये पोस्ट कर्मचार्‍यांच्या संपास शंभर टक्के प्रतिसाद, वडूज पोस्ट ऑफिससमोर केंद्रीय डाक कर्मचार्‍यांची जोरदार निदर्शने

 

वडूज : आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी खटाव-माण तालुक्यातील पोस्ट कर्मचार्‍यांनी दोन दिवस संप पुकारला आहे. भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पुकारलेल्या या संपास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यसाठी अधिकारी, कर्मचार्‍यांनी वडूज येथील पोस्ट कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करीत भांडवलदारांना मोदी सरकार मदत करीत आहे. डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या अभ्यासाने बनवलेले कामगारहिताचे कायदे मोदी सरकार बदलू पाहत आहे. कामगारांच्या न्याय- हक्कासाठी देशभरातील कोट्यावधी कामगारांनी 8 व 9 जानेवारी 2019 ला पुकारण्यात आलेल्या अखिल भारतीय संप खटाव व माण तालुक्यात शंभर टक्के यशस्वी झाल्याचे अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेचे सातारा जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजेंद्र सानप यांनी वडूज येथे सांगितले
जुन्या पेन्शनची अंमलबजावणी ,रिक्त जागांची भरती प्रक्रिया लवकर सुरू करणे ,कंत्राटीकरण बंद करणे, जनविरोधी खाजगीकरण रद्द करण्यासाठी, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षेच्या हक्कासाठी देशभरातील कामगारांचा सर्व संघटनांच्या वतीने 8 व 9 जानेवारी 2019 ला अखिल भारतीय संप पुकारण्यात आला आहे.
या देशव्यापी ऐतिहासिक संपात संपूर्ण सातारा जिल्ह्यासह खटाव व माण तालुक्यातील सर्व सब पोस्ट ऑफिसमधील डाक कर्मचाऱयांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. वडूज पोस्ट ऑफिससमोर केंद्रीय डाक कर्मचार्‍यांनी जोरदार निदर्शने केली. या प्रसंगी अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेचे सातारा जिल्हा सहसचिव शाहीर कॉम्रेड राजेंद्र सानप , कॉम्रेड परमेश्वर केंद्रे, प्रमोद तीवाटणे , संदीप केंद्रे , विजय अहिरे आदींसह डाक कर्मचारी उपस्थित होते.