खटावला तहसिलदार देता का कोण तहसिलदार….? बदलीनंतर मागणी   

सातारा  :सध्या कोरोना महामारी मुळे खटाव तालुक्यात लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.सातारा  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  समिती संपूर्ण नियंत्रण करीत आहे.तालुका पातळीवर तहसिलदार यांच्या आदेशानुसार महसुली व आपत्ती निवारण बाबत कामकाज केले जाते. परंतु सध्या प्रशासकीय बदल्यामुळे नेमून झालेल्या पदावर तत्कालीन तहसिलदार हजर झाले याला अपवाद खटाव तालुका असून अद्याप ही तहसिलदार दालनाच्या दरवाज्याचा टाळा निघाला नसल्यामुळे खटाव तहसिलदार देताय का  कोण तहसिलदार ? अस म्हणण्याची पाळी  खटावकरांवर आली आहे.

याबाबत नागरिकांनी दिलेली माहिती अशी खटाव तालुक्याचा कार्यभार हा वडूज नगरीतून होत आहे. महसुली कामकाजनिमित तसेच जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले असे विविध दाखले काढण्यासाठी दररोज शेकडो लोक वडूज कार्यालयात भेट देतात. सध्या तत्कालीन तहसिलदार अर्चना पाटील यांची प्रशासकीय बदली होऊन त्या सांगली कार्यालयात रुजू झाल्या पण त्यांच्या जागी नियुक्ती झालेले खटावचे तहसिलदार किरण जमदाडे यांच्या चांगल्या कामाची नोंद घेऊन त्यांना  सोलापूर येथून खटावला सोडण्यात  आले नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून खटावचे  नायब तहसिलदार सिताकांत शिर्के यांच्याकडे तहसिलदार पदभार सोपविण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गत आदेश निर्गमित करण्यासाठी तहसिलदार यांना अधिकार आहेत. त्यामुळे या पदासाठी तात्काळ हालचाल होणे गरजेचे आहे.

खटाव तालुक्यामध्ये महसुली १४३ गावे येतात. तर वाड्या वस्त्यासह १५३ गावे आहेत. सध्या नवीन तहसिलदार यांच्या स्वागतासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तर सामान्य जनता आपले प्रश्न सोडवण्यासाठी नूतन तहसिलदारांच्या प्रतीक्षेत आहेत. खटाव तालुक्यातील अतिवृष्टी व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई साठी पंचनामे लवकरात लवकर झाल्यास शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात  मदत होणार आहे. तरी नूतन तहसिलदार यांनी त्वरित पदभार स्वीकारावा अशी रास्त मागणी खटाव तालुक्याच्या वतीने  वडुज नगर पंचायत विरोधी पक्षनेते नगरसेवक शहाजीराजे गोडसे,  विजय शिंदे, श्रीकांत देवकर यांनी केली आहे.